आमदारांच्या आचरणाचे ठरणार 'नियम'; नऊ सदस्यीय विशेष समितीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:14 IST2026-02-07T19:14:07+5:302026-02-07T19:14:37+5:30
लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीवर असणार समितीचा 'वॉच'

आमदारांच्या आचरणाचे ठरणार 'नियम'; नऊ सदस्यीय विशेष समितीची घोषणा
सावंतवाडी : आमदारांनी दौऱ्यांदरम्यान कसे वागावे आणि त्यांचे सार्वजनिक आचरण कसे असावे, यासाठी विधिमंडळाने नऊ सदस्यीय विशेष समिती गठित केली आहे. या समितीत सावंतवाडीचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्या सुसंस्कृत आणि अभ्यासू प्रतिमेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपचे आमदार चैनसुख संचेती या समितीचे अध्यक्ष असून, यात सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच पक्षांतील अनुभवी नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. आमदारांच्या अभ्यासदौऱ्यांवर अनेकदा होणारी टीका लक्षात घेता, ही समिती आता वर्तणुकीची नवी नियमावली (Code of Conduct) तयार करणार आहे.
सुसंस्कृत स्वभावाची 'पावती'
दीपक केसरकर हे त्यांच्या संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. राजकीय वादळातही त्यांनी आपली सुसंस्कृत प्रतिमा जपली. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी त्यांची या समितीत वर्णी लावली आहे.
कोकणातील दोन 'शिलेदार'
विशेष म्हणजे या समितीत कोकणातून दीपक केसरकर यांच्यासोबतच ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचाही समावेश आहे. याशिवाय दिलीप वळसे पाटील, रामराजे निंबाळकर यांसारखे दिग्गज नेतेही या समितीत आपले योगदान देतील.
शिस्तीची नवी 'चौकट'
अनेकदा दौऱ्यांदरम्यान लोकप्रतिनिधींच्या वागण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आता ही समिती दौऱ्यातील शिष्टाचार निश्चित करेल. आमदारांच्या वर्तणुकीसाठी स्पष्ट नियमावली आखेल. विधिमंडळाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करेल.