खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:03 IST2025-12-27T19:02:27+5:302025-12-27T19:03:27+5:30
Khopoli Murder case: खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी सुनिल तटकरे यांनी केली.

खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
मुंबई - खोपोलीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी शिंदेसेनेच्या आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुनिल तटकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी स्थापन करावी.
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध व्यक्त करत तपास यंत्रणांनी शीघ्रगतीने तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी करतानाच इतर बाबतीत जे बोलले जात आहे ते तथ्यहीन आहे, असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.
एखाद्या घटनेत तपास सुरू असतो, त्यावेळी एखादे मतप्रदर्शन करणे उचित नसते. जी घटना घडली किंवा त्यांचे काय वादविवाद होते याबद्दलची माहिती नक्कीच पोलीस विभागाकडे असणार आहे. माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसावा, असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला. पण शेवटी तपास सुरू आहे, त्यामुळे तपासात काही बाधा येईल, असे कोणतेही वाक्य मी बोलणार नाही, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
थोरवेंना जे काही करायचे आहे ते करु द्या. शेवटी थोरवेंचा पूर्व इतिहास काय आहे हे त्यांच्या निवडणूक अर्ज प्रक्रियेत पाहू शकता आणि सुधाकर घारे यांचाही पाहू शकता, नेमका कुणाचा पूर्व इतिहास काय आहे तो असा टोलाही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.
भरत गोगावले हे मंत्री आहेत आणि त्यांचा पूर्व इतिहास लोकांना माहित आहे. त्यांनीच मालवणच्या सभेत नेता बनायला काय लागते ते सांगितले आहे. यावर आता जास्त बोलायचे नाही, असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.