"कोकणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी शक्तीपीठ मार्गाचा सरकारचा अट्टाहास’’, काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:06 IST2025-03-20T17:05:00+5:302025-03-20T17:06:52+5:30
Harshavardhana Sapkal Criticize Maharashtra Government: पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे. तसेच कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी हा शक्तीपीठ मार्ग बांधला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

"कोकणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी शक्तीपीठ मार्गाचा सरकारचा अट्टाहास’’, काँग्रेसचा गंभीर आरोप
पालघर - भारतीय जनता पक्षाचे सरकार लाडके उद्योगपती अदानीसाठी रेट कार्पेट टाकत आहे. मुंबईतील धारावी अदानीला विकली आहे, मुंबईतील महत्त्वाचे भखंड अदानीच्याच घशात घातले आहेत. नवी मुंबई विमानतळही अदानीलाच दिलेले आहे आणि आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे. तसेच कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी हा शक्तीपीठ मार्ग बांधला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
पालघर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांचा विरोध असताना, आवश्यकता नसतानाही भाजपा सरकार नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग टाकत आहे. जेट्टीतून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल इंडियापर्यंत अदानी अंबानीला रेड कार्पेट टाकले जात आहे. गोव्यातील कोळसा आणि खनिजे यांचा व्यापर या दोन उद्योगपतींना सहज करता यावा आणि कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी हा शक्तीपीठ मार्ग बांधला जात आहे. कोकणी माणूस एकजूट करुन राहतो त्याला छेद देण्यासाठी व या लोकांना शांत बसवण्यासाठी सिंधुदुर्गातील वाचाळवीर मंत्री बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्मण करत आहेत. आता पालघरमध्येही असेच फासे टाकले जात आहेत, इथल्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. हा आदिवासी भाग आहे पण जमीन अधिगृहणामध्ये त्यांना दिलेल्या संरक्षणाची पायमल्ली सुद्धा केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस २०१४ ते १९ पाच वर्ष मुख्यमंत्री होते नंतर फोडाफोडी करून २.५ वर्षे ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे, आता मोठे बहुमत मिळाले आहे पण राज्यात विदारक परिस्थिती आहे आणि त्याला फडणवीस सरकारच जबाबदार आहे. भाजपाच्या राज्यात शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे. महिला अत्याचार वाढत आहेत, नव्याने गँग पुढे येते आहेत. रेती गँग, कोयता गँग, आका, खोक्या गँगनी उच्छाद मांडला आहे. सत्ताधारी पक्षातील गुंड खंडणी वसुली करताना दिसत आहेत. राज्य सरकारकडे विकास कामासाठी पैसे नहीत, अर्थसंकल्पात मोठी महसूली तुट आहे परिणामी उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसत नाही. राज्य सरकामधील प्रमुख नेते नरेंद्र मोदींचे मोठे गुणगाण गात असतात, या ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीत जाऊन राज्यासाठी स्पेशल पॅकेज आणावे पण या तिघांमध्ये ती धमक नाही असेही सपकाळ म्हणाले.
विधानसभेला आघाडी होती त्यामुळे पालघरमध्ये काँग्रेसचे उमेदवार देता आले नाहीत पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वास सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला.