प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 19:18 IST2025-07-20T19:18:21+5:302025-07-20T19:18:54+5:30
Praveen Darekar News: वसई येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना येथील अपुलँड बॅक्वेट हॉलमधील लिफ्ट अचानक बंद झाल्याने प्रवीण दरेकर यांच्यासह इतर काही जण लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करून या लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांची सुखरूप सुटका करण्यात आली.

प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर हे आज वसई दौऱ्यावर आले असताना मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. वसई येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना येथील अपुलँड बॅक्वेट हॉलमधील लिफ्ट अचानक बंद झाल्याने प्रवीण दरेकर यांच्यासह इतर काही जण लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करून या लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांची सुखरूप सुटका करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाबाबत मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासाठी प्रवीण दरेकर हे वसई पश्चिम येथील कौल हेरिटेज सिटीमधीधील अपुलँड ग्रँड बॅक्वेट हॉल येथे आले होते. त्यावेळी प्रवीण दरेकर हे येथील लिफ्टने जात असताना ही दुर्घटना घडली. लिफ्टमध्ये १० माणसांची क्षमता असताना १७ माणसांनी प्रवेश केल्याने ही लिफ्ट बंद पडली. लिफ्ट अचानक बंद पडल्याने तिथे उपस्थित असलेल्यांची तारांबळ उडाली.
सुमारे पाच ते दहा मिनिटे प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, खूप प्रयत्नांनंतर लोखंडी रॉड आणि इतर वस्तूंच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकर आणि इतरांची बंद पडलेल्या लिफ्टमधून सुटका करण्यात आली. यावेळी प्रवीण दरेकर यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हेसुद्धा लिफ्टमध्ये होते. लिफ्टमधून सुटका झाल्यानंतर सर्व नेते कार्यक्रमस्थळी रवाना झाले.