"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:51 IST2024-12-29T12:50:33+5:302024-12-29T12:51:52+5:30
Jitendra Awhad Vs Rupali Thombre: व्हॉट्सॲप चॅटच्या व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही रूपाली ठोंबरे यांनी हे व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचेच असल्याचे सांगत आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शनिवारी आक्रोष मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाबाबत जितेंद्र आव्हाड यांचे कथित व्हॉट्सॲप चॅट व्हायरल झाले होते. तसेच हे व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचे असल्याचा दावा अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केला होता. दरम्यान, या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रिनशॉन हे खोटे असल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रूपाली ठोंबरे यांच्यासह आणखी काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही रूपाली ठोंबरे यांनी हे व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचेच असल्याचे सांगत आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, हा स्क्रिनशॉट आपल्या व्हॉट्सॲप चॅटचा नाही हे जितेंद्र आव्हाड स्वत:च कसे काय सांगू शकतात? हा स्क्रिनशॉट जर फेक असेल, तर पोलीस यंत्रणा तपास करेल. तो स्क्रिनशॉट जितेंद्र आव्हाड यांच्याच व्हॉट्सॲप चॅटचा आहे. तसेच जितेंद्र आव्हाड सोशल मीडियावर पोस्ट टाकून ट्रायल चालवण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. हा खटला कोर्टात चालेल, असेही रूपाली ठोंबरे म्हणाल्या.
दरम्यान, रूपाली ठोंबरे यांनी केलेला दावा फेटाळून लावताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, माझा खोटा व्हॉट्सॲप चॅटचा व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला. कर नाही और डर कशाला? फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा आहे, याची संपूर्ण माहाती मी ट्वीटद्वारे दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ' चौकशी सुरू आहे' , हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे.