Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 16:57 IST2025-10-12T16:54:51+5:302025-10-12T16:57:40+5:30
MNS Worker slap to Non-Maharashtrian woman Viral Video: रेल्वेतून उतरताना पतीला मारहाण करत, शिवीगाळ केली. तसेच मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने एका परप्रांतीय महिलेच्या कानशिलात लगावली.

Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
Thane Viral Video: रेल्वेतून उतरताना धक्के देत मारहाण, तसेच शिवीगाळ करणाऱ्या एका परप्रांतीय महिलेला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने कार्यालयात नेऊन कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कानशिलात लगावणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्याच्या पतीसोबतच हा प्रकार घडला. कळवा स्थानकावर उतरताना परप्रांतीय महिलेने धक्के दिले, तसेच मारहाण करत शिवीगाळ केली. मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेला माफी मागायला लावत मनसेकडून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्जून काटे हे मनसे पदाधिकारी असलेल्या स्वरा काटे यांचे पती आहेत. अर्जून काटे यांना लोकलमधून कळवा रेल्वे स्थानकात उतरताना धक्के देत, मारहाण केल्याचा प्रकार घडला.
कळवा स्थानकात नेमकं काय घडलं?
मनसेचे विनायक बिटला यांनी परप्रांतीय महिलेचा माफी मागतानाचा व्हिडीओ पोस्ट करत सगळा घटनाक्रम सांगितला.
मनसे पदाधिकारी स्वरा काटे यांचे पती अर्जुन काटे यांना रेल्वेमधून उतरताना आणि रेल्वे परिसरात चालताना परप्रांतीय महिलेने मागून धक्के मारले. तिला धक्का लागला म्हणून तिने मागून ढकलले. अर्जुन काटे यांनी त्या बाबत मराठीत त्वरित विनंती केली की, 'मॅडम धक्का मारत जाऊ नका, नीट जावा. परंतु त्या महिलेने मराठीत बोलल्यामुळे अर्जुन काटे यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करून मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले व मारहाण केली, असे विनायक बिटला यांनी सांगितले.
परप्रांतीय महिलेने इतर लोकांनाही शिवीगाळ केली. अर्जुन यांनी त्यावेळी काही उलट उत्तर न देता थेट पोलीस स्टेशन गाठले व पुढील कारवाई केली. परंतु महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना अद्दल घडवणे गरजेचे होते म्हणूनच मनसे पदाधिकारी स्वरा काटे व त्यांचे पती त्या महिलेला मनसे जनसंपर्क कार्यालयात घेऊन आले व त्या महिलेला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची माफी मागायला लावली, असे सांगत बिटला यांनी घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
कोणीही असो माज उतरवणार
मनसेचे पदाधिकारी बिटला यांनी मराठी माणसाला डिवचणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही दिला आहे. 'महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला डिवचले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यामध्ये कोणतीही तडजोड करणार नाही, मग ते कोणीही असो यांचा माज उतरवणार हे नक्की. या निमित्ताने सर्व अमराठी लोकांना ही समज देत आहे की महाराष्ट्रात राहत आहात तर प्रेमाने राहा. मराठी माणसाच्या नादी लागू नका', असा इशारा त्यांनी या घटनेनंतर दिला आहे.