‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 08:57 IST2025-04-21T08:56:08+5:302025-04-21T08:57:23+5:30
दोनदा उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा अनुभव गाठीशी असल्याने मनसेने दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र द्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरवू नये अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले.

‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत एकमेकांना दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. उद्धव ठाकरेंनी अट टाकत एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानाचा उद्धव सेनेने दुसऱ्या दिवशी खुलासा करत कोणतीही अट नाही, असे म्हटले असून एकत्र येण्याबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, यापूर्वी दोनदा उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा अनुभव गाठीशी असल्याने मनसेने दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र द्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरवू नये अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले.
सत्ताधारी भाजपकडून यावर सध्या वेट ॲण्ड वॉचची भूमिका असली तरी ‘ती अट आहे की कट’ असे विधान करत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना उचकवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय होणार यावर बोलताना मविआतील शरद पवार गटाने ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवलेली नाही. फक्त महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे हात मिळवणी करणार नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. प्रमुखांनी भाष्य केल्यावर बाकी मनसे नेत्यांनी कशाला वाद हवा?
संजय राऊत, उद्धवसेना
कोण हिंदुत्ववादी नाही हे प्रमाणपत्र भाजपने देऊ नये. तसेच उबाठानेही हा महाराष्ट्रद्रोही आहे, असे प्रमाणपत्र कोणाला देऊ नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर १७ हजार गुन्हे दाखल झाले होते. त्याबद्दल उद्धव ठाकरे मनसेची माफी मागणार का? - संदीप देशपांडे, मनसे नेते
एकाने साद घातली आहे, एकाने अट घातली आहे. पण ती अट आहे की कट आहे ते दोघांनी ठरवावे. त्यांनी आपआपसात ठरवले तर त्यांना शुभेच्छा आहेत. सगळ्यांनी आपापल्या कुटुंबात सुखी रहावे आमचे काहीही म्हणणे नाही. तो आनंदाचा विषय आहे. - आशिष शेलार, मंत्री व भाजप नेते
राज ठाकरे यांच्या मनात काय चालले आहे हे कुणीच सांगू शकत नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांनी कोणासोबत जावे, हा त्यांच्या पक्षांचा विषय आहे. युतीबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही नेते सक्षम आहेत. त्यामध्ये इतरांनी बोलणे उचित नाही. - गुलाबराव पाटील, मंत्री व शिंदेसेनेचे नेते
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पण, समाेरच्यांकडून कशा पद्धतीने ते कमी लेखण्यात आले हे दिसले. उद्धव ठाकरे यांचे उत्तर म्हणजे शाळेतील भांडणासारखे आहे. - उदय सामंत, मंत्री व शिंदेसेनेचे नेते