दोन कोटी जनतेच्या हाती दहा खासदारांचे भवितव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 06:00 IST2019-03-02T06:00:00+5:302019-03-02T06:00:06+5:30
जसे जसे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली तशी , दादा, साहेब , भैय्या, अशा सर्वांनी मतदारसंघात मोर्चा बांधणी आणि आपला डंका वाजवण्यास सुरुवात केली.. पण..

दोन कोटी जनतेच्या हाती दहा खासदारांचे भवितव्य
पुणे : पुणे विभागातील लोकसभा मतदार संघाच्या दहा जागांसाठी १ कोटी ९३ लाख ९६ हजार ७५५ मतदार मतदान करतील. त्यासाठी १ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांचे बळ लागेल. आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, नागरिकांना अजूनही मतदार यादीत नाव नोंदविता येईल. मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करावी, नसल्यास नाव नोंदवावे असे आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसेकर यांनी पुणे विभागातील दहा लोकसभा मतदरासंघांतील निवडणुकीच्या कामांची माहिती दिली. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या दहा जागा आहेत. या जिल्ह्यातील एकूण मतदार १ कोटी ८६ लाख १८ हजार ५४६ इतके आहेत. मात्र, मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण हे विधानसभा मतदार संघ येतात. तर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा मतदारसंघ उस्मानाबादला जोडलेला आहे. त्यामुळे विभागातील दहा मतदारसंघातील मतदारांची संख्या १ कोटी ९३ लाख ९६ हजार ७५५ इतकी होते. या मतदारांसाठी १० हजार ५०४ मतदान स्थळांवर २० हजार ७३६ मतदानकेंद्रावर मतदानाची सुविधा उभारण्यात येणार आहे.
म्हैसेकर म्हणाले, कोणताही मतदार मतदान प्रक्रियेच्या बाहेर राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. केवळ वयाचा पुरावा आणि रहिवासी पुरव्याच्या आधारावर मतदारयादीत नाव नोंदविता येणार आहे. विशेषत: १८ ते १९ वयोगटातील युवकांची नोंदणी करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. परगावी असलेल्या विद्याथ्यार्ला आपल्या मतदारसंघाच्या यादीतही मतदार नोंदणी अर्ज भरुन नाव नोंदविता येईल. तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. असे अर्ज संबंधित मतदारसंघात हस्तांतरीत करण्यात येतील.
-----------------------
जिल्हानिहाय मतदारसंख्या लोकसभा आणि विधानसभांच्या जागा
जिल्हा मतदारसंख्या लोकसभा जागा विधानसभा जागा
पुणे ७३,६३,८१२ ४ २१
सातारा २४,८४,०३९ १ ८
सांगली २३,५०,३५९ १ ८
सोलापूर ३३,४४,५८५ २ ११
कोल्हापूर ३०,७५,७५१ २ १०
------------------------------
मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या
मतदारसंघ पुरुष महिला एकूण
मावळ ११,६५,७९० १०,६१,३१० २२,२७,१३३
पुणे १०,४१,७४५ ९,८२,९३० २०,२४,७३१
बारामती १०,९१,६३२ ९,८५,६२५ २०,७७,२७८
शिरुर ११,१२,३६८ ९,९९,०६६ २१,११,४६५
सोलापूर ९,४८,५०८ ८,७१,७१० १८,२०,२५९
म्हाडा ९,९०,३०४ ८,९५,९९७ १८,८६,३१३
सांगली ९,२४,६२८ ८,६७,४४१ १७,९२,१३१
सातारा ९,२८,६२० ८,९४,८४० १८,२३,४७६
कोल्हापूर ९,५४,७८८ ९,१३,४३३ १८,६८,२३५
हातकणंगले ९,१२,०७७ ८,५३,५९६ १७,६५,७३४
एकूण १,००,७०,४६० ९३,२५,९४८ १,९३,९६,७५५
----------------------------
जिल्हानिहाय मतदानकेंद्र आणि स्थळांची संख्या
जिल्हा मतदानकेंद्र स्थळे
पुणे ७,६६६ २,९७६
सातारा २,९७० २,१२९
सांगली २,४०५ १,४२०
सोलापूर ३,४८० १,९११
कोल्हापूर ३,३२१ १,८४२
------------------
दिव्यांग मतदारांची संख्या पोहोचली ६१ हजारांवर
पुण्यामध्ये १२,७८२, सातारा १० हजार, सांगली १६,६३३, सोलापूर ८ हजार ४०० आणि कोल्हापूरात १४ हजार १४५ दिव्यांग मतदार आहेत. कर्णबधिरत्व असलेले दिव्यांग व्यक्ती सहज लक्षात येत नाहीत. या प्रक्रियाते कर्णबधिर व्यक्ती सुटू नयेत याची खबरदारी घेण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी प्रशासनाला दिली आहे.