शिक्षकांनाे, रागावू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:55 IST2025-12-28T12:55:36+5:302025-12-28T12:55:56+5:30
एकेकाळी शाळेची घंटा वाजली की, अंगावर काटा यायचा. गुरुजी वर्गात आले की पाटी, वही अन् मान सरळ. आजोबांच्या पिढीत शाळा म्हणजे शिस्तीचा किल्ला होता. वडिलांच्या पिढीत तो थोडा सैल झाला; पण दरारा होताच. आज वर्गखोलीत शिस्त उभी आहे, मात्र संभ्रमाच्या पायावर. कारण शिक्षण विभागाची नवी नियमावली सांगते ‘विद्यार्थ्यांना रागावू नका... नाहीतर कडक कारवाई करू.’ आणि या एका वाक्याने शिक्षक, पालक आणि समाज सगळेच विचारात पडले आहेत.

शिक्षकांनाे, रागावू नका
बालाजी देवर्जनकर, मुख्य उपसंपादक, नागपूर -
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ जुन्या पिढीला नक्की आठवेल. उलट्या हातावरची छडी, रोज वेगळी संख्या सांगून रांगेत उभे करून उठाबशा, पायातून हात घालून बसवलेला कोंबडा असा शिक्षा होत. त्यावेळी मार खाल्ला म्हणून कोणी शाळा सोडली नाही; उलट अनेकजण म्हणतात, ‘त्यामुळेच आम्ही घडलो.’ दुसरीकडे, आजची ‘जेन झेड’ पिढी. या नावाचाच अर्थ अनेकांना नीट ठाऊक नाही; पण ही पिढी स्क्रीनवर वाढलेली, प्रश्न विचारणारी आणि अधिकारांबाबत जागरूक आहे. शिक्षकांचा राग, कठोर शब्द किंवा उपहास या सगळ्यांना ती सहज स्वीकारत नाही.
घराघरांत संवादाचा प्रश्न गंभीर आहे. दिवसभर मोबाइलवर बोटं चालतात. आई-वडील आणि मुलांमधील बोलणं कमी होत चाललं आहे. किती पालक रोज दहा मिनिटं तरी निवांतपणे मुलांशी बोलतात? आणि मग सगळ्या अपेक्षा मात्र शाळेकडून. संस्कार घडवा, शिस्त लावा, सगळं सांभाळा. मोठ्या शहरांत मुलं कॅफेत गप्पा मारताना दिसतात, तर ग्रामीण भागात शाळाच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पटसंख्या घटतेय, शिक्षक अतिरिक्त ठरताहेत आणि सरकारी शाळांतील वर्गखोल्या ओस पडताहेत.
अशा परिस्थितीत शिक्षण विभागाचा निर्णय येतो, शिक्षकांनी रागवायचं नाही, शारीरिक किंवा मानसिक त्रास द्यायचा नाही. तत्त्वतः हा निर्णय अत्यंत योग्य आहे. कोणत्याही मुलाला मारहाण किंवा त्याचा अपमान होऊ नये, हे मान्यच आहे; पण प्रश्न असा आहे की, शिस्त नसेल तर वर्गखोली चालेल का? भीती नसेल तर अभ्यास होणार नाही, हा जुना समज कितपत खरा आहे? पूर्वी शिक्षक कडक होते; पण त्यांच्याबद्दल आदरही होता. आज मात्र एखादा शब्द चुकला, आवाज चढला की, व्हिडीओ तयार होतो, सोशल मीडियावर फिरतो आणि कारवाईची मागणी होते. शिक्षक विचारात पडतात. बोलावं की गप्प बसावं? रागवावं की दुर्लक्ष करावं? या भीतीतून निर्माण होणारी शांतता ही शिस्त नाही, तर असाहाय्यता आहे.
शिक्षण विभागाला काही प्रश्न
शिक्षण विभागाने नियमांचे एकामागोमाग एक ‘पिल्लू’ सोडताना वर्गखोलीतील वास्तव लक्षात घ्यावे. नियम कागदावर सुंदर दिसतात; पण त्यांची अंमलबजावणी शिक्षकांच्या हातात असते. शिक्षण विभागाने एक मूलभूत प्रश्न स्वतःला विचारला आहे का, शिक्षकांना ‘रागावू नका’ असे सांगताना, त्यांना पर्याय काय दिला आहे? छडी काढून घेतली; पण संवादाची साधने दिली का? शिस्त ठेवायला सांगितली, पण त्या शिस्तीची व्याख्या स्पष्ट केली आहे का?
हे उपाय करता येऊ शकतात...
सतत तुलना, स्पर्धा, अपेक्षा आणि ऑनलाइन जगाचा दबाव यांमुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. अशा वेळी जुनी छडी उपयोगाची ठरत नाही; पण याचा अर्थ असा नाही, की शिक्षकांनी केवळ निरीक्षक बनून बसावे. मग मार्ग काय?
पहिला मार्ग म्हणजे संवादाची पुनर्स्थापना. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिघांमध्ये विश्वासाचा पूल उभारला पाहिजे.
दुसरा मार्ग म्हणजे शिस्तीची नवी व्याख्या भीतीवर आधारित नव्हे, तर स्पष्ट नियम, सातत्य आणि जबाबदारीवर आधारित हवी.
तिसरा मार्ग म्हणजे जेन झेडची मानसिकता, समुपदेशन व सकारात्मक शिस्त यांबाबत शिक्षकांना प्रशिक्षण.