तमाशापटांचे बादशहा, दिग्दर्शक अनंत माने जयंती

By Admin | Published: September 22, 2016 01:36 PM2016-09-22T13:36:20+5:302016-09-22T13:36:20+5:30

तमाशापटांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले, पौराणिक, ग्रामीण, संतपट, ऐतिहासिक, शाहिरांच्या जीवनावरील, सामाजिक विनोदी आणि तमाशापटांचे दिग्दर्शन करणारे अनंत माने यांची आज (२२ सप्टेंबर) जयंती.

Tamashapat's emperor, director Anant Mane Jayanti | तमाशापटांचे बादशहा, दिग्दर्शक अनंत माने जयंती

तमाशापटांचे बादशहा, दिग्दर्शक अनंत माने जयंती

googlenewsNext
>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २२ - तमाशापटांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले, पौराणिक, ग्रामीण, संतपट, ऐतिहासिक, शाहिरांच्या जीवनावरील, सामाजिक विनोदी आणि तमाशापटांचे दिग्दर्शन करणारे अनंत माने यांची आज (२२ सप्टेंबर) जयंती.  सांगत्ये ऐक अश्या सुंदर चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.
 
कोल्हापूरच्या मराठी मातीचा गंध घेऊन अनंत माने जन्मले. त्यांचे काका ज्ञानोबा माने हे पैलवान या नावाने ओळखले जात. ते ‘प्रभात फिल्म कंपनी’त नट म्हणून काम करत. त्यांच्याबरोबर बाल अनंता बर्‍याचवेळा स्टुडिओत जाई. तिथले मोहमयी वातावरण पाहून त्यालाही आपण सिनेमात जाऊन नट व्हावे असं वाटे. सातवीची परीक्षा देण्यापूर्वीच आपल्या काकांबरोबर एक दिवस तो ‘प्रभात’मध्ये जाऊन तिथे काम करू लागला. तिथे रसायन खात्यात हरकाम्या म्हणून त्याने आपल्या उमेदवारीला सुरुवात केली. तो काळ होता १९३० चा. त्यावेळी ‘प्रभात’मध्ये व्हेअर इज बॉम्बे हा मूकपट तयार होत होता.
 
रसायन खात्यात त्यावेळी फिल्मवरील सर्व रासायनिक प्रक्रिया म्हणजे फिल्म धुणे व वाळवणे हे सारं हातानेच करावं लागे. त्याकरिता पन्नास गॅलनच्या आठ टाक्यात पाणी वाहून भरावे लागे. तसेच तापमानासाठी पहाटे शंभर पौंडी बर्फाच्या दहा लाद्या फोडून ते बर्फ टाकीतील पाण्यात टाकावे लागे. तशा पाण्यात आठ आठ तास उभे राहून फिल्म धुण्याचे काम करावे लागे. अनंता ही सारी कामे कमीपणाची न मानता मनापासून करीत असे. कारण चित्रसृष्टीने त्याला झपाटून टाकले होते. सुरुवातीची दीड वर्षे बिनपगारी काढल्यावर त्याला पुढे दरमहा दहा रुपये पगार मिळू लागला. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी सर्वच खात्यांमध्ये सर्वांना काम करावे लागे. संकलन, छायाचित्रण, ध्यनिमुद्रण या सर्व खात्यातून वावरताना अनंताला कलात्मकतेचे अंकुर फूटू लागले. योगायोगाने लवकरच ‘नट’ होण्याची त्याची इच्छा पुरी झाली. भारतातल्या पहिल्यवहिल्या ‘सैरन्ध्री’ या रंगीत चित्रपटात अनंताने विष्णूची भूमिका केली.
१९३३ साली ‘प्रभात’चे कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतर झाले. काकांबरोबर अनंताही पुण्याला आला. शांतारामबापूंच्या कलात्मक व तांत्रिक ज्ञानाचा अनंतावर एवढा जबरदस्त पगडा होता की त्याने त्यांना विनंती करून जिथे दिग्दर्शनाचा श्रीगणेशा गिरवता येतो त्या संकलन खात्यात बदली करून घेतली. वर्षभरात त्याने संकलनाची सारी तांत्रिक अंग आत्मसात करून शांतारामबापूचा विश्‍वास संपादन केला.
 
‘आल्हाद चित्र’च्या बाळा जो जो रेच्या वेळी माने व ग. दि. माडगूळकर यांच्यात अंगाई गीतावरून खटका उडाला. माडगूळकरांनी लिहिलेले अंगाई गीत ऐकून माने म्हणाले, ‘तुमचे गीत साहित्याच्या दृष्टीने उत्तम आहे. पण सामान्य प्रेक्षकांना ते बोजड होईल. तुमचं गीत घराघरातून प्रत्येक स्त्रीने म्हटले पाहिजे किंबहुना घरकाम करणार्‍या मोलकरणीच्यासुद्धा ते तोंडात बसले पाहिजे.’ यावर माडगूळकर मान्यांवर भडकले व गीताचा कागद टराटरा फाडून त्यांच्या अंगावर फेकत म्हणाले, ‘मी हे तुमचे गीत लिहिणार नाही.’ यावर माने खोलीतून निघून गेले. थोडा वेळ गेल्यावर माडगूळकरांनी मान्यांना हाक मारली व म्हणाले, ‘या बसा’ आणि नवीन लिहिलेले अंगाई गीत त्यांनी ऐकवले. हे गीत होतं-
..बाळा जो जो रे
पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे..
हे गाणं ऐकून मान्यांचा चेहरा खुलला. माडगूळकरही खूष होऊन म्हणाले, ‘कसं आहे?’ माने म्हणाले, ‘एकदम बेस्ट!’ पुढं हे अंगाई गीत विलक्षण लोकप्रिय झाले. माने-माडगूळकर यांची तर तेव्हापासून गट्टीच जमली, ‘आल्हाद चित्र’ने चार वर्षे अतिशय उत्तम चित्रपट निर्माण केले. पण शेवटी कर्जफेड न करता आल्यामुळे ‘आल्हाद’वर जप्तीची नोटीस आली ही मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी घटना होती.
९ मे १९९५ साली त्यांचे निधन झाले.
 
सौजन्य : इंटरनेट 
 

Web Title: Tamashapat's emperor, director Anant Mane Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.