मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, एकदिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलावले आणि २४ तासांत निर्णय घ्यावा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
महायुतीकडे २५० आमदार आहेत. जनतेने इतके मोठे मॅन्डेट दिले आहे. त्याचा उपयोग समाजासाठी करा, अशी आपली विनंती असल्याचे सुळे म्हणाल्या. शरद पवार चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आरक्षण का नाही दिले ? या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुप्रिया म्हणाल्या, आता तुम्ही अकरा वर्षे गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्तेत आहात तर करून दाखवा, आमची सहकार्याची भूमिका आहे. निर्णय घेणे कोणाच्या हातात आहे ? सत्ताधारी की विरोधी पक्षाच्या ? सत्ता म्हणजे फक्त लाल दिव्याची गाडी, प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टर नाही. मायबाप जनता असते, असा टोमणा त्यांनी अजित पवार यांना लगावला.