रायगडमध्ये तटकरे, कोल्हापुरात महाडिक; लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं ठरलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 18:47 IST2019-01-04T18:43:41+5:302019-01-04T18:47:15+5:30
राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे, महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

रायगडमध्ये तटकरे, कोल्हापुरात महाडिक; लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं ठरलं!
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. तर कोल्हापुरमधून धनंजय महाडिक मैदानात असतील. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. रायगड आणि कोल्हापूर या दोन जागांवरील उमेदवार राष्ट्रवादीनं निश्चित केले आहेत. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरेंचं नाव निश्चित झालं आहे. तटकरे यांच्या नावाला भास्कर जाधव यांनी विरोध केला होता. त्यामुळे रायगडमधून कोणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल उत्सुकता होती. मात्र शरद पवारांनी निष्ठावंत तटकरेंच्या पारड्यात वजन टाकलं. आता निवडणुकीत भास्कर जाधव यांची भूमिका नेमकी काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. धनंजय महाडिक हे सध्या लोकसभेत कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे महाडिक या जागेसाठी आग्रही होते. मात्र त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा विरोध होता. मात्र शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचे केवळ चार उमेदवार निवडून आले होते.