राष्ट्रवादीला सुनेत्रा पवारांच्या 'होकारा'ची प्रतीक्षा; थोड्याच वेळात चर्चा करणार; आमदारांना ठेवले वेटिंगवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:44 IST2026-01-30T18:42:58+5:302026-01-30T18:44:28+5:30
Sunetra Ajit Pawar oath ceremony news : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का? बारामतीकडून 'होकार' येताच उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक.

राष्ट्रवादीला सुनेत्रा पवारांच्या 'होकारा'ची प्रतीक्षा; थोड्याच वेळात चर्चा करणार; आमदारांना ठेवले वेटिंगवर...
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा पवार यांची निवड होण्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची थोड्याच वेळात चर्चा होणार आहे. त्यांच्याकडून 'होकार' मिळताच उद्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सत्तेचा आणि संघटनेचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. विविध चर्चा केल्या जात आहेत. यामुळे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री केले तर परिस्थिती निवळू शकते, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर कालच, गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यानंतर लगेचच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुढील नेता कोण असणार यावरून चर्चा सुरु केली होती. परंतू, सुनेत्रा पवार यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर पाहता त्यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नव्हती, असे अनेकांचे म्हणणे होते. परंतू, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे एवढे मोठे कुटुंब सांभाळण्यासाठी अजित पवारांचा वारसदार ठरविणेही तितकेच गरजेचे होते. यामुळे राष्ट्रवादीने या हालचाली सुरु केल्या आहेत.
जर सुनेत्रा पवारांनी आज रात्रीपर्यंत संमती दिली, तर उद्या (शनिवारी) सायंकाळी राजभवनावर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होऊ शकतो. यासाठी पक्षाने विधानभवन सचिवालयाला पत्र देऊन बैठकीची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, सुनेत्रा पवारांचा अधिकृत होकार आल्याशिवाय आमदारांना मुंबईत येण्याचे निरोप अद्याप देण्यात आलेले नाहीत.
बारामतीकडून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा
अजित पवार आणि बारामती हे समीकरण अखेरपर्यंत होते. यापुढेही बारामतीच राष्ट्रवादीचे केंद्र ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या जबाबदारीसाठी तयार आहेत का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पक्षातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न
अजितदादांच्या अकाली जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांना सत्तेत मुख्य स्थान देणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे मत वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्याचे समजते. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री केले तर येत्या सहा महिन्यांत त्यांना विधानपरिषदेवर किंवा अजित पवारांच्या रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातून निवडून यावे लागणार आहे.