Sunetra Pawar: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अजितदादांच्या निधनानंतर स्वीकारली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 06:22 IST2026-02-01T06:21:23+5:302026-02-01T06:22:48+5:30
Sunetra Pawar Takes Oath as Deputy CM: अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अजितदादांच्या निधनानंतर स्वीकारली जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी शनिवारी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची परवानगी घेतली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचे नाव शपथ घेण्यासाठी नाव पुकारले. त्या व्यासपीठावर गेल्या. त्यांनी 'गांभीर्यपूर्वक' शपथ घेतली. यावेळी कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. सुनेत्रा पवार शपथ घेण्यासाठी जाताना व शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उपस्थित आमदारांनी 'अमर रहे अमर रहे अजित पवार अमर रहे', 'एकच वादा अजित दादा' अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित भावनिक झाले होते.
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर पक्ष आणि प्रशासन दोन्ही आघाड्यांवर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पक्षावर नियंत्रण ठेवणे, निर्माण झालेल्या संकटातून पक्षाला बाहेर काढणे व संघटनात्मक स्थैर्य राखणे, ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
"अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत 'शिव-शाहू-फुले-आंबेडकर' यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे", असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. विधानभवनात अजित पवार ज्या दालनात बसायचे त्याच दालनातील हॉलमध्ये दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीबाबतचे ठराव मांडले.
"महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल सुनेत्रा पवार यांना मी शुभेच्छा देतो. त्या महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे 'व्हिजन' पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे", असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्या धिरोदात्तपणे सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. महाराष्ट्रासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील असा मला विश्वास आहे."
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ ही खाती सोपविण्यात आली आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेले वित्त खाते मात्र त्यांना मिळाले नाही. हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून तेच आगामी अर्थसंकल्प सादर करतील. सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेल्या निवडीची माहिती देण्यासाठी आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून शपथविधी सोहळ्याबाबत विनंती करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आणि समीर भुजबळ उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना याबाबत अवगत केले आणि सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा नाही
सुनेत्रा पवार इतक्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाहीत. नियमातील तरतुदीनुसार त्या उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरी विधानसभेवर निवडून येईपर्यंत राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहू शकतात. बारामती पोटनिवडणुकीतील विजयानंतर त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे.