शिर्डीतील साईबाबा मंदिर उघडा; भाजपाच्या खासदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 21:14 IST2020-08-21T21:13:58+5:302020-08-21T21:14:53+5:30
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिर उघडा; भाजपाच्या खासदाराची मागणी
अहमदनगर : शिर्डीतील साईसमाधी मंदिर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे, ते तातडीने खुले करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. तसेच, केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
शिर्डीत कोरोना चाचणी संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त शिर्डीत आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिर्डीतील साईबाबा मंदिर खुले करण्याची मागणी केली आहे. यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
आंतराष्ट्रीय कीर्ती प्राप्त असलेले साईबाबा मंदिर साडेपाच महिन्यापासून बंद आहे. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच अनुमती दिली आहे. मात्र राज्य सरकार निर्णय का घेत नाही? राज्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळे आहेत. ऑनलाईन पासेसच्या माध्यमातून दर्शनाचे ते नियोजन करु शकतात. अशा मंदिरांना राज्यसरकारने परवानगी देण्याची गरज आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
याचबरोबर, शिर्डीचे सर्व अर्थकारण येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. मंदिर बंद असल्याने सध्या सर्व व्यवहार ठप्प आहेत. केंद्र सरकारने विविध उपायोजना राबवून देशवासींयाना मदत केली आहेच. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या इतर गरजा देखील मोठ्या आहेत. त्यामुळे येथील अर्थकारण पुन्हा सुरळीत होण्यासाठी तातडीने निर्णय होण्याची गरज आहे. आवश्यक ते नियम व अटी पाळून मंदिर उघडण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.