महायुतीत टोकाचा तणाव

By Admin | Updated: September 15, 2014 04:38 IST2014-09-15T04:38:01+5:302014-09-15T04:38:01+5:30

राज्यात गेली २५ वर्षे सुरू असलेली शिवसेना-भाजपा युती भाजपाची जागा वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने सपशेल फेटाळून लावल्याने संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली

Stress of the Greatest Era | महायुतीत टोकाचा तणाव

महायुतीत टोकाचा तणाव

मुंबई : राज्यात गेली २५ वर्षे सुरू असलेली शिवसेना-भाजपा युती भाजपाची जागा वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने सपशेल फेटाळून लावल्याने संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागा वाढवून मिळत नसल्याने भाजपाचे नेते नाराज असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट टीका केल्याने भाजपा नेत्यांचा अक्षरश: तीळपापड झाला आहे.
शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता शुक्रवारी भाजपाच्या नेत्यांनी मातोश्री गाठले होते. मात्र एकही जागा वाढवून देणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेनेने बैठकीत घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा हे सूत्र वर्षानुवर्षे ठरलेले असून त्यामध्ये बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केल्याने भाजपाचे नेते निराश होऊन परतले. शनिवारी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपली मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर करताना लोकसभा निवडणुकीत विजय केवळ एकट्या नरेंद्र मोदी यांचा नाही तर शिवसेनेचाही त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, असे मत व्यक्त केले. यामुळे भाजपा नेत्यांचा तीळपापड झाला. शनिवारी रात्री भाजपा नेत्यांची बैठक झाली व त्यामध्ये या टीकेचा समाचार घेण्याचे ठरले. राज्यात भाजपा नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास इतकी अनुकूल संधी पुन्हा येणार नाही, असे भाजपाला वाटते. शिवसेनेने जागावाटपात तडजोड केली आणि १३५ किंवा त्यापेक्षा अधिक जागा दिल्या तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा पाया खिळखिळा केल्यासारखे होईल, अशी भीती शिवसेनेला वाटते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Stress of the Greatest Era