"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:52 IST2025-08-04T16:50:37+5:302025-08-04T16:52:18+5:30
मी शिवसेनेचा बाप आहे, या परिणय फुके यांच्या विधानाने महायुतीत कलगीतुरा रंगला आहे. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल बोलताना माध्यमांना सुनावलं, कारण...

"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
Devendra Fadnavis Latest News: भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या एका विधानावर महायुतीत नवा वाद उफाळला. 'शिवसेनेचा बाप मीच' या फुके यांच्या वक्तव्याने शिंदेंच्या शिवसेनेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच विधानाबद्दल जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीसांनी माध्यमांना खडेबोल सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री परिणय फुके यांनी केलेल्या विधानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना का सुनावलं?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "असं आहे की, अलिकडच्या काळामध्ये वाक्य कापून कापून दाखवणं आणि त्याच्यावर दिवस काढणं, हे आपण सुरू केलेलं आहे; हे बंद करा. मला माहिती होत की तुम्ही हे विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली."
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "त्यांनी हे सांगितलं की, कुठल्याही गोष्टीचं श्रेय आईला जाते आणि त्याच्यात काही चुकलं तर बापावर केलं जातं. भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काहीही झालं की माझ्यावर टाकतात. त्याच्या मी बाप आहे का? अशा प्रकारचं आहे."
"त्या विधानाचा असा त्याचा अर्थ होत नाही"
"ठीक आहे. हे वक्तव्य पूर्ण पार्श्वभूमीवर बघितलं, तर... तसं बोललं पाहिजे, नाही बोललं पाहिजे हा त्यांचा विषय आहे. पण पूर्ण पार्श्वभूमीवर बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे, असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही. त्यामुळे अर्थवट वाक्ये कापायची आणि ती चालवायची हे बंद केलं पाहिजे", अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांचे कान टोचले.
परिणय फुकेंचं विधान काय?
भंडाऱ्यामध्ये भाजपचा मेळावा पार पडला. मेळाव्यात बोलताना परिणय फुके म्हणाले, "अनेकजण माझ्यावर आरोप करतात. मी आरोपांना उत्तर देत नाही. पण माझ्या लक्षात आलं की, जर मुलगा परीक्षेत चांगले गुण मिळवत असेल, तर त्याचे नाही त्याच्या आईचे कौतुक केले जाते. मुलाने वाईट केले, तर त्याचा दोष बापाला दिला जातो. तेव्हा मला माहीत झालं की, शिवसेनेचा बाप मीच आहे. नेहमी खापर माझ्यावरच फोडले जाते."