राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक; दर्जेदार पिकांचा ‘ब्रँड महाराष्ट्र’ तयार करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 05:25 AM2021-05-21T05:25:51+5:302021-05-21T05:26:19+5:30

पिकांचे वर्गीकरण करून महाराष्ट्र हा शेतीतील ब्रॅण्ड झाला पाहिजे.

State level kharif pre-season meeting; Create 'Brand Maharashtra' of quality crops, CM appeals | राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक; दर्जेदार पिकांचा ‘ब्रँड महाराष्ट्र’ तयार करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक; दर्जेदार पिकांचा ‘ब्रँड महाराष्ट्र’ तयार करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

googlenewsNext

मुंबई : आधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधनातून दर्जेदार पिकांचा ‘ब्रँड महाराष्ट्र’ तयार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत ते बोलत होते. त्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला.

शेतकऱ्याच्या मालाला हमीभावापेक्षा हमखास भाव मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ‘विकेल ते पिकेल’ या अभियानांतर्गत ‘मागणी आहे ते पिकवा आणि दर्जेदार उत्पादन घ्या’ या संकल्पनेच्या माध्यमातून काम केले जात आहे. पिकांचे वर्गीकरण करून महाराष्ट्र हा शेतीतील ब्रॅण्ड झाला पाहिजे. कृषी विभागाची कामगिरी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन काळात आणि यंदाही उत्तम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्ह्यांचे पालकमंत्री, राज्याचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदांचे सीईओ सहभागी झाले. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी खरीप हंगामाबाबत सादरीकरण केले.

कृषिमंत्री भुसे म्हणाले की, राज्याचे खरीप हंगामातील अपेक्षित क्षेत्र १५७ लाख हेक्टर आहे. यामध्ये कापूस ४३ लाख हेक्टर, सोयाबीन ४३.५० लाख हेक्टर, भात १५.५० लाख हेक्टर, मका ८.८४ हेक्टर, कडधान्याचे क्षेत्र २३ लाख हेक्टर आणि ऊस ९.५० लाख हेक्टर आहे. खरीप हंगामासाठी सर्व प्रकारची मिळून ६३.६४ लाख मे. टन रासायनिक खते व १८.२६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. सन २०२१-२२ साठी युरियाचा दीड लाख मेट्रिक टन संरक्षित साठा करण्याचे नियोजन असून, सध्या ३० हजार मेट्रिक टन साठा झाल्याचे त्यांनी सांगितले.

रासायनिक खतांचे शासनामार्फत नियोजन 
रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, किमती कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याने सध्या खतांचा जो साठा विक्रेत्यांकडे आहे तो कमी दरात शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत नियोजन केले जाईल. राज्यात पीकविम्यासाठी ‘बीड मॉडेल’ राबविण्याचे प्रयत्न आहेत.- अजित पवार, उपमुख्यमंत्री.

Web Title: State level kharif pre-season meeting; Create 'Brand Maharashtra' of quality crops, CM appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.