...तर एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 21:42 IST2019-02-28T21:34:38+5:302019-02-28T21:42:15+5:30
शरद पवारांची फडणवीस सरकारवर जोरदार टीका

...तर एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं- शरद पवार
पुणे : देशात घटनेने दिलेला विचार व्यक्त करण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एल्गार परिषद प्रकरणी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांना पाठिंबा दिला. पुण्यात आयोजित शिवगौरव शिवसन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, लेखक प्रताप गंगावणे, अभिनेते शंतनू मोघे, शाहीर दादा पासलकर, विकास पासलकर आदी उपस्थित होते.
न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याचं काम कोळसे पाटील करतात, असं शरद पवार म्हणाले. आम्ही सत्तेत असतो, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं. कोर्टाने निकाल दिल्यानंतरही काही अधिकारी सत्तेचा गैरवापर करुन त्यांना अडचणीत आणू पाहत होते. त्यांना एका खटल्यातून दुसऱ्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न झाला. अशावेळी म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं. पण काळ सोकावतो. महाराष्ट्राचं प्रशासन असं चालणार नाही, हे ठणकावून सांगायची वेळ आली आहे,' असंही पवार म्हणाले.