राज्यात रब्बीची ५० टक्के क्षेत्रावर पेरणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:12 PM2018-12-28T14:12:54+5:302018-12-28T14:22:50+5:30

राज्याच्या कृषी विभागातर्फे पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

sowing 50 percent of the rabbi area In the state | राज्यात रब्बीची ५० टक्के क्षेत्रावर पेरणी 

राज्यात रब्बीची ५० टक्के क्षेत्रावर पेरणी 

Next
ठळक मुद्देराज्यात रब्बी पिकाच्या एकूण ५६.९३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २८.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीराज्यात काही ठिकाणी पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम

पुणे: राज्यात रब्बी पिकाची पेरणी प्रगतीपथावर असून आत्तापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.त्यात ज्वारी पिक वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत,गहू उगवण,मुकुटमुळे फुटण्याच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा अवस्थेत आहे.त्याचप्रमाणे हरभरा पिक वाढीच्या,फुलोरा तर काही ठिकाणी घाटे धरणे,घाटे पक्वतेच्या अवस्थेत आहे. 
राज्याच्या कृषी विभागातर्फे पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला असून राज्यात २१ डिसेंबरपर्यंत रब्बी पिकाच्या एकूण ५६.९३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २८.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.तर राज्यात खरीप हंगामातील भात नाचणी,ज्वारी,भुईमुग पिकांची कापणी/काढणी अंतिम टप्प्यात आहे.तूर पिक शेंगा धरणे पक्वतेच्या अवस्थेत असून काढणी सुरू आहे.तसेच कापूस पिक बोंडे पक्वतेच्या अवस्थेत असून वेचणी प्रगतीपथावर आहे.राज्यात काही ठिकाणी पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने आपल्या अहवाल व्यक्त केली आहे.
पुणे विभागात रब्बी पिका खालील क्षेत्र १७.८३ लाख हेक्टर असून त्यातील ६.४० लाख हेक्टर क्षेत्रावर (३६ टक्के)पेरणी झाली आहे.विभागातील ज्वारी पीक वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत ,मका पिक वाढीच्या तर गहू पिक उगवण ते मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे.त्याच प्रमाणे हरभरा पिक उगवण,फांद्या फुटण्याच्या तर काही ठिकाणी फुलोरा व घाटे धरण्याच्या अवस्थेत आहे.विभागात काही ठिकाणी जमिनितील ओलाव्या आभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून काही पिके सूकू लागली आहेत. लाभ क्षेत्रात व नदीकाठच्या क्षेत्रावर गऊ व हरभरा पिकांची पेरणी सुरू आहे.प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील १२० हेक्टर ज्वारी क्षेत्रावर व मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादूर्भाव अढळून आला आहे.
कोकण विभागात रब्बी पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून नागपूर विभागात ८० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.नागपूरपाठोपाठ अमरावती विभागात ७२ टक्के,कोल्हापूरात ६२ टक्के,लातूर विभागात ५८ टक्के तर नाशिकमध्ये ४६ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीच्या पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
........
राज्यात उशीरा लागवड झालेल्या कापूर पिकावर डिसेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेल्या १ हजार ५२३ गावांपैकी ७८ गावांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर दिसून आला आहे.मात्र बोंड अळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळे काही गावांमधील बोंड अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात आलेला आहे,असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे..
.............................
अहमदनगर जिल्ह्यात ४ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर,औरंगाबादमध्ये १ हजार ८४१ आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक १४ हजार १११ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादूर्भाव असल्याचे दिसून आले आहे.एकूण १९ हजार ९९६  हेक्टर क्षेत्रावरील ऊसावर हुमणी प्रादूर्भाव आहे.


 

Web Title: sowing 50 percent of the rabbi area In the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.