बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 09:10 IST2025-11-14T09:05:08+5:302025-11-14T09:10:55+5:30
Maharashtra Local Body Election 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे.

बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
मुंबई - नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे. बंडखोरीवर हा उपाय शोधल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत विचारविनिमय केला. काही वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करण्यात आली.
आमची ८० टक्के नावे अंतिम झाली आहेत, उद्यापर्यंत आणखी २० टक्के नावे ठरतील आणि १५ तारखेपर्यंत सर्व नावे निश्चित होतील, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. उमेदवारांच्या नावांची प्रदेश स्तरावरून मुंबईत घोषणा केली तर बंडखोरीचे पेव फुटेल. त्याऐवजी आधी सर्वच जिल्हा प्रभारींकडे बी फॉर्म पाठविण्यात आले असल्याने ज्यांना प्रदेशाकडून उमेदवारी दिली जाईल त्यांच्याकडे प्रभारी हे अर्ज सोपवतील आणि ते उमेदवार अर्ज भरतील, अशी रणनीती आखण्यात आल्याचे समजते.
तरच आधी यादी जाहीर
१७ तारखेच्या आत बहुतांश ठिकाणी बंडखोरी होत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले तरच आधी यादी जाहीर करा नाहीतर मुदत संपल्यानंतर ती जाहीर करा, असे मत ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे व्यक्त केल्याचीही माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींमधील संभाव्य तीन-तीन नावे मागविण्यात आली. काही निवडक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ही नावे अजूनही निश्चित करण्यात आलेली नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी अशा जिल्ह्यांच्या अध्यक्ष/प्रभारींशी आज व्यक्तिश: चर्चा करून नावे तत्काळ पाठवा, घोळ घालू नका, असे सांगितल्याची माहिती आहे. महायुतीच्या समन्वय समितीची संयुक्त पत्र परिषद १८ नोव्हेंबरला मुंबईत होईल.
काँग्रेसने आपले उमेदवार केले निश्चित
स्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीनुसार काँग्रेस लढवणार असणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील सर्व उमेदवारांची नावे पक्षाने निश्चित केली आहेत. टिळक भवन येथे काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची दोन दिवसांची बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, रासप यांच्याशी आघाडी झालेली आहे.
ही आघाडी लक्षात घेऊनच पक्षाने सर्व उमेदवार निश्चित केले आहेत. ‘मनसे’शी आघाडी करण्यासंदर्भात कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव आलेला नाही, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
महापालिका मतदार यादी २० रोजी प्रसिद्ध होणार
राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात तिसऱ्यांदा बदल केला आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारूप मतदार यादी महापालिका प्रशासन आता २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे. तसेच या प्रारूप यादीवर २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत.
५ डिसेंबर रोजी हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर ८ जानेवारीला रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करून १२ जानेवारी रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार या यादी सुधारित आदेशानुसार जारी केली जाणार आहे.