माती परीक्षण आता एका मिनिटात!

By Admin | Updated: March 18, 2015 01:22 IST2015-03-18T01:22:27+5:302015-03-18T01:22:27+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात टेक्सास विद्यापीठाचे डेव्हिड सी. विनडॉर्फ यांचे मार्गदर्शन.

Soil testing now in one minute! | माती परीक्षण आता एका मिनिटात!

माती परीक्षण आता एका मिनिटात!

राजरत्न सिरसाट/अकोला : माती परिक्षणाच्या पारंपरिक पद्धतीवर अमेरिकेने मात केली असून, उपग्रहाद्वारे अवघ्या एका मिनिटात परिपूर्ण अहवाल देणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेतकर्‍यांना शेतातील मातीचा सामू बघून कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, याचा ताळमेळ बसवून हमखास उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भात करण्यासाठीचा करार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत केला असून, अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठात कार्यरत या तंत्रज्ञानाचे जनक तथा कृषी विज्ञान आणि नैसर्गिक संसाधन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता (संशोधन) डॉ. डेव्हिड सी. विनडॉर्फ हे येथील शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांना १६ मार्चपासून प्रशिक्षण देत आहेत.
माती परीक्षणाचे हे एक्सआरएफ तंत्रज्ञान आहे. मातीचा प्रत्यक्ष नमुना न घेता त्यामध्ये कोणते मूलद्रव्य कमी आहेत, हे केवळ साठ सेकंदात सांगता येते आणि तीन तासांत जवळपास १८0 मातीचे नमुने या तंत्रज्ञानाने काढण्यात येतात. प्रामुख्याने शेतातील गंधक, जिप्सम आदी सर्वच घटकांसह मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये शोधली जातात.
माती परीक्षण केले तर मातीचा सामू कळतो. मातीत कोणते गुणधर्म कमी आहेत, हे समजते आणि त्यावर उपाययोजना म्हणून कोणती खते वापरावीत, याचे नियोजन करता येते. त्यामुळे शेतकर्‍यांना योग्य ते उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा होतो. माती परीक्षणाचे तंत्रज्ञान आहेच, पण या नवीन यंत्राचा वापर वीस वर्षांपूर्वी झाला होता. यामध्ये नवे संशोधन करण्यात आले आहे. जलतपासणीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची शुद्धता तपासली जाते. पाण्यात कोणती जड तत्त्वे, जलप्रदूषक आहेत, हे लगेच कळते. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होत असल्याने या तंत्रज्ञानाचा अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भात करण्यासाठी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी टेक्सास विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला असून, हे तंत्रज्ञान कसे वापरावे, यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी डॉ. विनडॉर्फ येथे आले आहेत.

Web Title: Soil testing now in one minute!