१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:13 IST2025-10-01T15:12:33+5:302025-10-01T15:13:13+5:30
Sindhudurg Crime News: दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना न सांगताच घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह जंगलात सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दीक्षा बागवे, असं या तरुणीचं नाव असून, ती घावनळे गावातील रहिवासी होती.

१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ
दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना न सांगताच घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह जंगलात सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दीक्षा बागवे, असं या तरुणीचं नाव असून, ती घावनळे गावातील रहिवासी होती. प्रेम प्रकरणातून तिची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याला आणखी कुणी मदत केली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दीक्षा तिमाजी बागवे ही १७ वर्षीय तरुणी २ ऑगस्ट रोजी कुणालाही न सांगता अचानक घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी खूप शोधाशोध केल्यानंतरही तिचा शोध लागला नव्हता. अखेरीस कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतरही तिचा काही पत्ता लागत नव्हता.
अखेरीस जवळच असलेल्या गोठोस गावातील जंगलामध्ये दीक्षा हिचा मृतदेह सापडला. दीक्षा हिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. मात्र या संदर्भातील तपासाबाबत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुप्तता बाळगली आहे.
दरम्यान, दीक्षा ही बेपत्ता झाल्यापासून तिचे कुटुंबीय चिंतीत होते. मात्र आता तिची हत्या झाल्याचे समोर येऊन तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.