Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 22:36 IST2025-10-31T22:35:56+5:302025-10-31T22:36:07+5:30
Sikandar Shaikh News: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणात ही कारवाई केली आहे. त्याचा राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे.

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
Sikandar Shaikh Arrest News: महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख मोठ्या प्रकरणात अडकला आहे. पंजाबपोलिसांनी सिकंदर शेख याला शस्त्रतस्करी प्रकरणात अटक केली आहे. सीआयए पथकाने राजस्थानातील पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. टोळीतील चार जणांना अटक करण्यात आले असून, यात एक सिकंदर शेख आहे.
पंजाबपोलिसांच्या पथकाने आरोपींकडून एक लाख ९९ हजार रुपये रोख, पाच पिस्तुले, काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन तसेच एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिकंदर शेखचा पपला गुर्जर टोळीशी थेट संबंध
पंजाब पोलीस विभागातील एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. अटक आरोपी हरयाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत. हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून पंजाब आणि परिसरात विक्रीस ठेवत होते. तिघेजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, सिकंदर शेखचा महाराष्ट्रातील गुन्हेगारी संबंध आहे का, हे तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी सापळ रचून चौघांना केली अटक
पोलिसांनी अटकेचा घटनाक्रमही सांगितला. २४ ऑक्टोबर रोजी दानवीर आणि बंटी या दोघांनी एक्सयूव्ही गाडीत दोन पिस्तुल घेऊन मोहालीत प्रवेश केला होता. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे दिली जाणार होती आणि तो ती कृष्ण उर्फ हैप्पी या व्यक्तीला देणार होता.
पोलिसांनी एअरपोर्ट चौकात सापळा रचून तिघांना अटक केली. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार उर्फ हैप्पी यालाही अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुले जप्त करण्यात आली.
महाराष्ट्र केसरी विजेता ते शस्त्र तस्कर
सिकंदर शेखने कोल्हापुरातील गंगावेश तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताब त्याने जिंकला. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे नाव झाले. तो क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करात भरती झाला होता, मात्र नंतर त्याने नोकरी सोडली.
बीए पदवीधर असलेला सिकंदर शेख मागील काही महिन्यांपासून पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता.