लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:26 IST2025-07-02T14:19:48+5:302025-07-02T14:26:58+5:30

Shivsena Dhanushyaban Election Symbol Case: शिवसेना फुटली त्याला आता चार वर्षे झाली आहेत. जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठे वादळ घोंघावले होते. यात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेले होते.

Shivsena DhanushyaBan Case: hear the Shivsena election symbol Bow and Arrow case; Supreme Court heard Uddhav Thackeray's demand before local body Election | लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी भाजपच्या साथीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा सुरुंग लावला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले होते. याला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्यावर आता सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे धनुष्यबाण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

एकदा का राज्यात निवडणुकांची घोषणा झाली तर निवडणूक चिन्हामध्ये बदल होऊ शकणार नाही. हे प्रकरण आधीच गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी असलेल्या वादावर अंतरिम निर्देश द्यावेत अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरेंच्या वकिलांची मागणी ऐकून घेतली आणि कामकाज स्थगित केले. तसेच पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

शिवसेना फुटली त्याला आता चार वर्षे झाली आहेत. जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठे वादळ घोंघावले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन आधी गुजरात मग गुवाहाटीला गेले होते. तिथेही काही आमदार त्यांना येऊन मिळाले होते. काही आमदारांनी गुजरातला जाताना शिंदेंच्या ताफ्यातून पलायन केले होते, काहीजण गुवाहाटीहून परतले होते. नंतर शिंदेंनी ठाकरेंचे सरकार पाडत आपले सरकार स्थापन केले होते. 

यानंतरच्या कायदेशीर लढ्यात निवडणूक आयोगाने व विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंचीच शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. तसेच निवडणूक चिन्हही दिले होते. ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या काळात लोकसभा निवडणूक पार पडली, विधानसभा देखील पार पडली आता शिवसेनेचा जीव असलेली मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांचे परंपरागत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हवे आहे. यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. 

मुंबई आणि शिवसेना...

मुंबई आणि शिवसेना हे गेल्या चार दशकांपासूनचे समीकरण आहे. कोकणात शिवसेनेचा यामुळेच विस्तार झाला होता. आता मुंबई महापालिकेची निवडणूक येत आहे. ही महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फारसे प्राबल्य नसले तरी एकनाथ शिंदेंकडे असलेल्या शिवसेनेचे आहे. अनेक शिवसैनिक ज्याच्याकडे पक्ष, धनुष्यबाण त्यालाच मतदान अशा भुमिकेत आहेत. यामुळे ठाकरे सेनेसमोर महापालिकेत झेंडा फडकवत ठेवण्याचे आव्हान आहे. शिवाय अनेक असे लोक आहेत जे धनुष्यबाण पाहून मतदान करतात. यासाठी देखील ठाकरेंना पालिका निवडणुकीपूर्वी धनुष्यबाण चिन्ह हवे आहे. 

Web Title: Shivsena DhanushyaBan Case: hear the Shivsena election symbol Bow and Arrow case; Supreme Court heard Uddhav Thackeray's demand before local body Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.