"राज्यात शिवद्रोहींचा उच्छाद, कोरटकरला चिल्लर भूषण, तर सोलापूरकरला थिल्लरभूषण पुरस्कार जाहीर करा’’, शरद पवार गटाचा खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 16:58 IST2025-03-15T16:57:07+5:302025-03-15T16:58:38+5:30
NCP SP Criticize Mahayuti Government: सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधून महायुती सरकारने प्रशांत कोरटकरला ‘चिल्लर भूषण’ आणि राहुल सोलापूरकरला ‘थिल्लर भूषण’ पुरस्कार जाहीर करावा, असा सल्ला शरद पवार गटाने दिला आहे.

"राज्यात शिवद्रोहींचा उच्छाद, कोरटकरला चिल्लर भूषण, तर सोलापूरकरला थिल्लरभूषण पुरस्कार जाहीर करा’’, शरद पवार गटाचा खोचक सल्ला
मागच्या काही दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकर आणि कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या केलेल्या अपमानाचा मुद्दा गाजत आहे. या दोघांवरही कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. दरम्यान, या मुद्द्या वरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने महायुती सरकारला खोचक सल्ला दिला आहे. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधून महायुती सरकारने प्रशांत कोरटकरला ‘चिल्लर भूषण’ आणि राहुल सोलापूरकरला ‘थिल्लर भूषण’ पुरस्कार जाहीर करावा, असा सल्ला शरद पवार गटाने दिला आहे.
महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. ह्या १०० दिवसांत महाराष्ट्राने अनुभवला तो फक्त सत्ताधारी पक्षांमधला अंतर्विरोध, अनागोंदी, अस्थिरता ह्याशिवाय महाराष्ट्राने काय पाहिलं? काहीच नाही. त्यात शिवद्रोहींनी महाराष्ट्रात उच्छाद मांडलाय, त्यांना मुक्तसंचाराची मुभा दिली गेली आहे म्हणून आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे कि, १०० दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधून सरकारने प्रशांत कोरटकरला ‘चिल्लर भूषण’ आणि राहुल सोलापूरकरला ‘थिल्लर भूषण’ पुरस्कार जाहीर करावा, असा खोचक सल्ला शरद पवार गटाने दिला आहे.
अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्याहून सुटले. पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत, असा दावा केला होता. त्यावरून शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला होता. दुसरीकडे कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना शिवरायांबाबत अनुद्गार काढले होते.