Shiv Sena Shinde Group MP Naresh Mhaske News: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. कायमचे एकत्र येण्यासाठीचे स्पष्ट संकेत मिळाले, पण तशी घोषणा करण्यात आली नाही. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्धवसेनेवर टीकास्त्र सोडत आहेत.
पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण केले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना दोन ओळीही मराठी बोलता येत नाहीत. प्रियांका चतुर्वेदी दोन शब्द मराठीत बोलू शकत नाहीत. त्यांना तर बाळासाहेब ठाकरे हे नाव स्पष्ट घेता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मराठीविषयी बोलण्याचा अधिकार काय? असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला.
राज ठाकरे आमच्याविरोधात काही बोललेले नाहीत
राज ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्याविरोधात बोलायचा विषय नाही. मराठी भाषेविषयी तळमळ, मराठी विचार याबाबतचा तो मेळावा होता. तो मेळावा कोणत्या पक्षाचा नव्हता. त्याच पद्धतीत त्यांनी भाषण केले. त्यातून मराठीविषयीची त्यांची तळमळ दिसून आली. राज ठाकरे आमच्याविरोधात काही बोललेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलण्याचा प्रश्नच येत नाही, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र, मराठी माणसांवर अन्याय असे भासवून निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठी माणसांना भडकावून त्यांची मते मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता. उद्धव ठाकरे पराभूत झालेले व्यक्ती आहेत. एकनाथ शिंदे काय आहे, त्यांची ताकद काय, त्यांच्या मागचा जनाधार त्यांनी दाखवून दिला आहे. मोठा जनाधार मिळाला आहे, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.