‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:34 IST2025-11-02T15:26:50+5:302025-11-02T15:34:33+5:30
Shiv Sena Shinde Group News: पन्नास वर्षे सत्ता भोगली, तेव्हा या गोष्टीचा विचार केला नाही. लोकसभेत मत चोरले, त्यांनाही धडा शिकवला पाहिजे, असा पलटवार करण्यात आला आहे.

‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
Shiv Sena Shinde Group News: मतदारयादीतील घोळावरून मनसे, महाविकास आघाडीसह विरोधकांनी ‘सत्याचा मोर्चा’ काढला. राज ठाकरे यांचे लोकलने मोर्चाला पोहोचणे, मोर्चाआधी उद्धव ठाकरेंशी त्यांनी केलेली चर्चा, मोर्चातील सहभागाविषयीची शंका दूर करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेला सहभाग आणि विविध विरोधी पक्षांच्या कार्यकर्ते, समर्थकांचा मोठा उत्साही सहभाग यामुळे मोर्चा लक्षणीय ठरला. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीत जे प्रकार झाले यामुळे सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवरचा विश्वासाला धक्का बसला आहे. सत्तेचा सर्रास गैरवापर केला जात असताना आपण सगळे पडेल ती किंमत देऊन ही चोरी थांबवू. तुम्हा सर्वांनी जबरदस्त ताकद दाखवली आहे. लोकशाही, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची ही वेळ आहे. आजच्या एकजुटीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवली. संविधानाने लोकशाहीत जो अधिकार दिला आहे, त्याचे रक्षण करण्याची वेळ आली आहे, असे शरद पवार ‘सत्याचा मोर्चा’त सभेला संबोधित करताना म्हणाले होते. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिले.
शरद पवार ५० वर्षांनंतर बोलत आहेत, हीच आश्चर्याची गोष्ट
शरद पवार ५० वर्षांनंतर बोलत आहेत, हीच आश्चर्याची गोष्ट आहे. यापूर्वीच्या निवडणुका त्यांनी लढवल्या ना. आम्ही सत्तेत येऊन किती वर्ष झाली? त्यांनी पन्नास वर्षे सत्ता भोगली, तेव्हा या गोष्टीचा विचार केला नाही. सत्ता नसताना अशी विधाने करणे सोपे आहे. सत्तेत असताना या सर्व गोष्टी करायला हव्या होत्या. मतचोरांना जरूर धडा शिकवा. लोकसभेत मत चोरले, त्यांनाही धडा शिकवला पाहिजे. आम्हाला मत चोरून कोणतीही निवडणूक जिंकायची नाही. आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत. लोकांच्या विश्वासावरच आम्ही निवडणुका जिंकू, असा निर्धार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सगळे जण जर दुबार मतदाराबाबत पुरावे देत असतील, तर निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. निवडणूक घ्यायची की, लांबवायची याबाबतही तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे. लोकांचा आक्रोश असेल, लोकांना वाटत असेल, तर मतदारयाद्यांची छाननी व्हायला पाहिजे. आमचा विरोध मोर्चाला नाही, मागणीला नाही, निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. महाविकास आघाडी एकत्र दिसली, त्यांना शुभेच्छा. निवडणुकीत पाहू, असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला.