“आर्थिक सुधारणा घडवणारे मनमोहन सिंग महान, पुढील पिढ्यांना अक्षय्य प्रेरणास्त्रोत”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:37 IST2024-12-27T13:36:05+5:302024-12-27T13:37:47+5:30
Sharad Pawar Reaction On Manmohan Singh Sad Demise: आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे, या शब्दांत शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.

“आर्थिक सुधारणा घडवणारे मनमोहन सिंग महान, पुढील पिढ्यांना अक्षय्य प्रेरणास्त्रोत”: शरद पवार
Sharad Pawar Reaction On Manmohan Singh Sad Demise: देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे वयाच्या ९२व्या वर्षी गुरुवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थऋषी गमावला आहे. मनमोहन सिंग यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील व सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. देशभरातून मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
शरद पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे, असे सांगत शरद पवार यांनी संवेदना व्यक्त केली आहे.
विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक
त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे.डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॉ. मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो!, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांनी दोनदा देशाचे पंतप्रधानपद भूषविले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तानंतर कर्नाटक येथे बेळगाव येथे सुरु असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रद्द करण्यात आली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे तातडीने बेळगावहून रवाना झाले व गुरुवारी मध्यरात्रीनंतर दिल्लीला पोहोचले.