"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:55 IST2025-07-15T20:53:59+5:302025-07-15T20:55:19+5:30
जयंत पाटील यांच्याजागी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड

"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोरगरीब जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत लवकरच राज्यभर दौरा करणार असून आर. आर. पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आगामी रणनिती सांगितली.
महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करेन!
"शरद पवार आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष केल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही देऊ इच्छितो, ज्या नेत्याने गोर-गरीब जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले, त्या नेत्याच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून राज्यातील अनेक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. या काळात पक्ष संघटना वाढवत असतानाच ही पक्ष संघटना मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेन आणि महाराष्ट्रात पक्षाची सत्ता आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करेन," असा शब्द शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना दिला.
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."
"पक्षातील अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी पात्र असताना सुद्धा मला मिळालेल्या संधीचे सोने करेन. सामान्य कुटुंबातील व्यक्ती नेता कसा होतो, हे आर. आर. पाटलांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात मी आवाज उठवेन. तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जनजागृतीही करेन," अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.
पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी राज्याचा दौरा
"पूर्वीच्या राजकारणाची आणि आताच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. हल्ली सत्ताबदल हा सत्तेच्या माध्यमातून आमिष दाखवून केला जातो. हे आपल्यापुढचे पहिले आव्हान आहे. या सर्व बदललेल्या यंत्रणेला लोकांपर्यंत पोहोचवून जागृत करेन आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करेन. महिन्याभरात मी राज्याचा दौरा करेन, पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. नवीन तरुणांना संधी देईन. सर्वधर्मीय तरुणांना एकत्र करुन संघटना मजबूत करेन," असे वचन शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिले.