"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:30 IST2025-10-06T16:30:19+5:302025-10-06T16:30:19+5:30
Sharad Pawar on BR Gavai Attack: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलांने बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली.

"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
CJI B.R. Gavai Attack Sharad Pawar: 'आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे', असे म्हणत शरद पवार यांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर चिंता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (६ ऑक्टोबर) सुनावणी सुरू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर पायातील बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच पकडले आणि बाहेर नेले.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एका प्रकरणावर सुनावणी घेत असताना एक वकील न्यायमूर्तींच्या समोरील जागेत आला आणि तो पायातील बूट काढण्यासाठी वाकला. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले. त्याला बाहेर नेण्यात आले. त्यावेळी सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही अशी घोषणा त्याने दिली.
शरद पवार म्हणाले, 'हा देशाचा अपमान'
या घटनेबद्दल शरद पवार म्हणाले, "लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे."
"आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ह्या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो", अशी भूमिका शरद पवारांनी या घटनेवर चिंता व्यक्त करताना मांडली आहे.
लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 6, 2025
ही घटना घडली तेव्हा सरन्यायाधीशांनी यामुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका असे म्हटले. वकिलाने अचानक केलेल्या या कृतीमुळे सर्वोच्च न्यायालयात गोंधळ निर्माण झाला. त्या वकिलाला बाहेर नेल्यानंतर सरन्यायाधीश गवई म्हणाले, "या सगळ्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. आम्हीही यामुळे आम्हीही यामुळे विचलित झालेलो नाहीत. अशा गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही", असे भाष्य सरन्यायाधीश गवईंनी केले होते.