शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:32 IST2025-07-15T18:30:53+5:302025-07-15T18:32:20+5:30
Shashikant Shinde Political Career: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आऊटगोइंग रोखून आगामी निवडणुकीत पक्षाला नवी उंची गाठून देण्यात शशिकांत शिंदे यांना यश येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जाते.

शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
Shashikant Shinde Political Career: अखेर शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.
राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. महायुतीत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. शरद पवार गटातील अनेक नेते महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेकदा असते. जयंत पाटील यांनाही भाजपाकडून ऑफर असल्याची राजकीय वर्तुळात असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आऊटगोइंग थांबवण्यात आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात शशिकांत किती यशस्वी ठरणार? तसेच आगामी निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदे यांची जादू चालणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. शशिकांत शिंदे यांची कारकीर्द अशी होती, ते जाणून घेऊया...
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते
शशिकांत शिंदे जावळी तालुक्यातील हुमगावचे रहिवासी आहेत. शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटले जाते. शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटले जाते. शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघात सक्रीय असून, ते दोनदा आमदार झालेले आहेत. शशिकांत शिंदे विधान परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसे शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद असून, आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, १९९९ मध्ये शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडूक जिंकली. त्यांनी कृष्णा खोरे जलसिंचन महामंडळात जलसंधारण मंत्री म्हणून काम केले. २००९ ते २०१४ दरम्यान शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते दोन वेळा जावळी आणि दोनदा कोरेगावमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. तर २०१९ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. २०२४ मध्ये शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.