कोल्हापूर : पाणी मागूनही सरकार पाणी देत नाही, त्यामुळे कोरडवाहू जमिनीवरच कसाबसा उदरनिर्वाह करतो. मात्र, एकेदिवशी मोजणी करणाऱ्यांनी आमच्या जमिनीत येऊन लाल रंगाच्या खाणाखुणा केल्या अन् अंगाचा थरकाप उडाला. जगण्याचे एकमेव साधन असलेली जमीन जाणार, या भीतीने आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत, वडील भावनाशून्य नजरेने पाहत असतात. त्यांचे अश्रू थांबवण्यासाठीच ३०० कि.मी. दूरहून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, या शब्दांत धाराशिव जिल्ह्यातील संभाजी फडतारे या युवकाने शक्तीपीठ महामार्गबाधितांच्या पडद्यामागील करुण कहाणीला वाचा फोडली.शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात आयोजित बैठकीत परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी महामार्गात जमीन गेली तर काय हाेईल, हे सांगताना मनामनाचे आक्रंदन उलगडले. आम्ही पाणी द्या म्हणतो, मात्र सरकार आमच्यावर प्रकल्प लादत आहे. महामार्गात सगळीच जमीन गेली तर या प्रकल्पाचे काय करू, असे सांगताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.वैराग (बार्शी, जि. सोलापूर) येथील विजयकुमार पाटील या शेतकऱ्यानेही आम्हाला न विचारता आमच्या जमिनी खरेदी करणारे, रेडिरेकनर ठरवणारे तुम्ही कोण, असा खडा सवाल केला. सख्ख्या भावाला इंचभरही जमीन आपण सोडत नाही, मग सरकारला का सोडायची, असे म्हणत त्यांनी शक्तीपीठाला इंचभरही जमीन देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
एकवेळ बलिदान देऊ; पण जमीन देणार नाहीपरभणीतील शांतीभूषण कच्छवे या युवा शेतकऱ्यानेही आई-वडिलांनी जोपासलेली जमीन डोळ्यांदेखत शक्तीपीठ महामार्गाला जात असल्याचे पाहवत नाही म्हणून या आंदोलनात उतरल्याचे सांगितले. सांगलीतील द्राक्षपट्ट्यातूनच हा महामार्ग जात असल्याने सांगत घनश्याम नलवडे यांनी सुपीक जमिनीवरचा हा नांगर बघवणारा नसल्याची खंत व्यक्त केली. अर्धापूर (जि. नांदेड) हा केळी उत्पादन करणारा जिल्हा. मात्र, या केळीच्या पट्ट्यातीलच जमीन महामार्गासाठी घेतली जात आहे. मात्र, भले बलिदान करावे लागले तरी चालेल; पण जमीन देणार नसल्याचा निर्धार येथील कचरू मुधाळे या शेतकऱ्याने केला.