दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:01 IST2025-05-22T11:00:22+5:302025-05-22T11:01:21+5:30
खोटे आश्वासन दिल्याचे स्पष्ट पुरावे असतील तर या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येईल, असे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. किशोर मोरे यांनी म्हटले. महिलेने उलटतपासणीत सांगितले की, आरोपीने एप्रिल २०२० मध्ये लग्नाचे आश्वासन दिले होते.

दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका
मुंबई : जेव्हा एखादी स्त्री परिणाम माहीत असूनही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिची संमती ‘चुकीच्या समजुतीवर’ आधारित मानली जाऊ शकत नाही, असे नमूद करीत सत्र न्यायालयाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका अनिवासी भारतीय (एनआरआय) शास्त्रज्ञाची निर्दोष मुक्तता केली.
खोटे आश्वासन दिल्याचे स्पष्ट पुरावे असतील तर या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येईल, असे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. किशोर मोरे यांनी म्हटले. महिलेने उलटतपासणीत सांगितले की, आरोपीने एप्रिल २०२० मध्ये लग्नाचे आश्वासन दिले होते. त्यावरून असे लक्षात येते की, आरोपी त्याच्या आई-वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करीत होता. कारण महिला विवाहित होती आणि तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. सर्व परिस्थिती विचारात घेता त्या दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, असेही न्यायालयाने नमूद केले.
“हॉटेलमध्ये आल्यापासून तिथून निघेपर्यंत महिलेने आरोपीच्या सहवासाचा आनंद घेतला. महिलेने हॉटेलचे कर्मचारी किंवा व्यवस्थापकाकडे आरोपीबाबत तक्रार केली नाही. तक्रार करण्यासाठी सहा दिवसांचा विलंब का झाला? याचे समाधानकारक कारण ती पीडिता देऊ शकली नाही”, असेही न्यायालयाने म्हटले. मूळ गुजरातचा असलेला पण युरोपमध्ये काम करणाऱ्या एनआरआय शास्त्रज्ञावर ठाण्यातील एका २७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका शास्त्रज्ञावर असा आरोप झाल्याने सर्वांचेच लक्ष खटल्याच्या निकालाकडे लागले होते.