समुद्र खवळला, सतर्कतेच्या सूचना; डोळ्यांत पाणी! मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, ५३ पशू ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:17 IST2025-08-18T14:11:52+5:302025-08-18T14:17:57+5:30
इसापूरचे १३, तर सिद्धेश्वरचे १२ दरवाजे उघडले; धाराशिवमध्ये १५ हजार हेक्टर पिके पाण्यात; पिके आधी पाण्यासाठी तहानली, नंतर पुरामुळे आडवी झाली... सोयाबीन, कपाशी, ज्वारीची शिवारं खरडून निघाली...

समुद्र खवळला, सतर्कतेच्या सूचना; डोळ्यांत पाणी! मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, ५३ पशू ठार
लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली: मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, अनेक जिल्ह्यांत नदी, नाल्यांना पूर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे कळमनुरी-शेंबाळ पिंपरी या विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक १६ ऑगस्टपासून बंद आहे. सिद्धेश्वर धरणही शंभर टक्के भरले आहे. रविवारी सकाळी या धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले.
लातूर, परभणी जिल्ह्यात धरणे भरली : लातूर जिल्ह्यातील धनेगाव पाणलोट क्षेत्रात दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील जलसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दोन दिवसांतील अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन पाण्यात
धाराशिव/परभणी : धाराशिव जिल्ह्यात १४ व १५ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार, १५ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली असून, ५३ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १०८ गावे पावसाने प्रभावित झाली. ६४ कच्च्या घरांची पडझड झाली. परभणी जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चार महसूल मंडलांत रविवारी अतिवृष्टी झाली. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व कापूस पिकांना फटका बसला आहे.
‘ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या’
मुंबई : राज्यात तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने तातडीने पंचनामे न करता मदत जाहीर करावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजविला. कोकणात धान, मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना फटका बसला. शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने जागे व्हावे आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
पुढचे ३ दिवस तुमच्या जिल्ह्यात कोणता इशारा? सर्वदूर कहर! पूर्णा, जगबुडी, पंचगंगेला पूर
अकोला: अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये दोन दिवस संततधार पाऊस झाला. त्यामुळे हजारो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील नऊ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. पूर्णा, काटेपूर्णा, उमा, पठार, गौतमा या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी आणि नाल्याकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे.
जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी: कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी दिवसभरात दोन फुटांनी वाढली असून, १६ बंधारे पाण्याखाली गेले. रत्नागिरीत पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रविवारी दुपारी खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
जळगाव जिल्ह्यात ८७ घरांमध्ये शिरले पुराचे पाणी
जळगाव: जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पारोळा तालुक्यात ८७ घरे, ३० गोठे आणि ६० दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी जायकवाडीकडे ४२ टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले.