दोन मृत्यूंमुळे साता-याची खाकी सुन्न !

By Admin | Updated: September 12, 2016 15:19 IST2016-09-12T14:49:34+5:302016-09-12T15:19:23+5:30

साता-यातील ‘खाकी वर्दी’साठी सोमवार उजाडला, तोच दोन दु:खद घटना घेऊन

Satya-Khaki numbness due to two deaths! | दोन मृत्यूंमुळे साता-याची खाकी सुन्न !

दोन मृत्यूंमुळे साता-याची खाकी सुन्न !

>विलास शिंदेंच्या मातोश्रीचे निधन तर दुसरीकडे कॉन्स्टेबल सावंत यांचा हृदयविकाराने मृत्यू 
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. १२ -  साता-यातील ‘खाकी वर्दी’साठी सोमवार उजाडला, तोच दोन दु:खद घटना घेऊन. मुंबई येथे मोटारसायकल स्वारांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा आज तेरावा होता. याची पूजा त्यांच्या मूळ गावी म्हणजे शिरगाव येथे सुरू असतानाच विलास शिंदे यांच्या मातोश्री कलाबाई विठ्ठल शिंदे (वय ८०) यांचे निधन झाले. मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांची तब्येत पूर्णपणे खालावली होती. विलास शिंदे यांच्या मृत्यूच्या दु:खातून कसेबसे सावरू पाहणारे शिरगाव पुन्हा एकदा आज शोकाकुल झाले. 
 
दरम्यान, सातारा येथे कार्यरत असणारे पोलिस कॉन्स्टेबल सूर्यकांत शंकर सावंत (रा. पोलिस लाईन, सातारा) यांचेही आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते साता-याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या निवासस्थानी बंदोबस्ताला होते. रात्रीची ड्यूटी संपल्यानंतर सकाळी घरातील गणेशाची पूजा करण्यासाठी लगबगीने घरी निघाले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मृत्यूसमयी त्यांचे वय फक्त ४७ होते. 

Web Title: Satya-Khaki numbness due to two deaths!