संतोष देशमुख हत्या: संध्या सोनवणे यांच्यानंतर ज्योती जाधव यांची सीआयडीकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 19:44 IST2024-12-30T19:40:56+5:302024-12-30T19:44:42+5:30
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून, सीआयडीने याप्रकरणी ज्योती जाधव यांची चौकशी केली.

संतोष देशमुख हत्या: संध्या सोनवणे यांच्यानंतर ज्योती जाधव यांची सीआयडीकडून चौकशी
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. बीड जिल्ह्यातील या घटनेची राज्यभर चर्चा सुरू असून, या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे सोपवला आहे. एकीकडे वाल्मीक कराडचा शोध घेतला जात असून, दुसरीकडे सीआयडीने चौकशीही सुरू केली आहे. रविवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची चौकशी करण्यात आल्यानंतर सोमवारी ज्योती जाधव यांची चौकशी केली.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना अद्यापही अटक न झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांनाही अटक करण्याची मागणी होत आहे. तीव्र पडसाद उमटल्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे दिले असून, सीआयडीने तपास सुरू केला आहे.
रविवारी (२९ डिसेंबर २०२४) राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांना सकाळीच बीड शहर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती. त्यांचे जबाब घेण्यासह इतरही काही पुरावे त्यांच्याकडून मिळवले जात आहेत.
ज्योती जाधव यांची सीआयडीकडून चौकशी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोमवारी ज्योती जाधव यांची चौकशी सीआयडीने केली. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनाही सीआयडीने माहिती घेण्यासाठी बोलवले होते.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या याचिकेबद्दल स्वतंत्रपणे माहिती देईन.
१०५ शस्त्र परवाने रद्द
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र बाळगणाऱ्यांचा मुद्दाही उपस्थित होत आहे. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत १०५ शस्त्र परवाने रद्द केले आहेत. बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही माहिती दिली.