"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:08 IST2025-08-21T12:07:40+5:302025-08-21T12:08:18+5:30
राज्याचा मुख्यमंत्री हा काही एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नसतो. ते ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत...

"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. तर ठाकरे बंधूंना ० जागा मिळाल्या. यानंतर, आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधान आले आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, "एवढा त्रास करून घ्यायची गरज नाही कुणाला. आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?" असे राऊत यांनी म्हटले आहे.
आम्हाला माहीत आहे, काय आहे ते? -
मुख्यमंत्री आणि राज ठाकरे भेटीसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, "जर मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल, तर ती होऊ द्या ना. राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकवेळा भेटले आहेत. गणपतीचे दिवसत आहेत. घरो घरी गणपती येत असतात. ते कदाचित गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यासंदर्भातील काही प्रश्न असतील. ज्या पद्धतीने फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली. मुंबईल बुडाली काय? दोन दिवस मुंबई बुडतेय. मुंबई, ठाणे नाशिक सारखी शहरे बुडाली. राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल. त्यामुळे एवढा त्रास करून घ्यायची गरज नाही कुणाला. आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?
"कशाला सांगू? आम्हाला माहीत आहे..." -
यावर काय आहे नेमकं? असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले, कशाला सांगू? आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. आता येथे आम्हीही अनेकदा भेटतो. म्हणून त्यावर चर्चा कशासाठी करायची? यापूर्वीही ते भेटले आहेत. भेटूदेत ना. कोण कशासाठी भेटतंय? हे भेटणारे नेतेच सांगू शकतात आणि काय चर्चा झाली. दोन प्रमुख नेते बेटत आहेत. यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत. त्या दोघांमध्ये आता बंद दाराआड चर्चा सुरू असेल, असे तुम्ही म्हणत आहात. तर, त्यांनीच सांगायला हवे की आम्ही का भेटलो? राज ठाकरे यांचा स्वभाव बघता, त स्पष्ट आणि परखडपणे या भेटीसंदर्भात बोलतील.
"मुख्यमंत्री हा काही एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नसतो..." -
दरम्यान, एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसता शिवसेना-मणसे, आणि त्याच दरम्यान ते भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो? असे विचारले असता राऊत म्हणाले, "ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत लक्षात घ्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणे हा काही राजकीय अपराध नाही. उद्या माझे काही काम असेल, उद्धव ठाकरे यांचे काही सामाजिक काम असेल, तर त्यांनीही भेटायला हवे. राज्याचा मुख्यमंत्री हा काही एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नसतो. ते ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत.