“कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकर गप्प का?” काँग्रेसच्या बॅनरवर संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:06 PM2023-06-01T16:06:03+5:302023-06-01T16:09:06+5:30

Sanjay Raut News: सचिन तेंडुलकरने कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत काहीच भूमिका मांडली नसल्याबाबत काँग्रेसने बॅनरबाजी केली. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

sanjay raut reaction over congress banner about sachin tendulkar on wrestlers agitation in delhi | “कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकर गप्प का?” काँग्रेसच्या बॅनरवर संजय राऊत म्हणाले...

“कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकर गप्प का?” काँग्रेसच्या बॅनरवर संजय राऊत म्हणाले...

googlenewsNext

Sanjay Raut News: लैंगिक छळवणूक प्रकरणी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी महिला कुस्तीपटू या दिल्लीत आंदोलन करत आहेत. २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना तसेच काही राजकीय पक्षांकडून या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र, याबाबत सचिन तेंडुलकर यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याबाबत काँग्रेसने बॅनरबाजी केली आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकर गप्प का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर देशातील अनेक विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका मांडली. भारतातील क्रीडाविश्वातील दिग्गजांकडून मात्र अद्याप पुरेसा पाठिंबा येत नसल्याची खंत विनेश फोगाटने बोलून दाखवली होती. यानंतर काँग्रेसने सचिन तेंडुलकरला उद्देशून बॅनर लावला आहे. याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. 

मतविरहित सचिन तेंडुलकरजी, तुम्ही मूग गिळून गप्प का?

मुंबई प्रदेश युवक काँग्रेसकडून हा बॅनर लावण्यात आला आहे. यामध्ये, मतविरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? किसान आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला तुम्ही उत्तर दिलं होतं की देशांतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नका. पण आज मात्र सचिन तुझं देशप्रेम कुठं गेलं आहे? तू सीबीआय-प्राप्तीकर विभागाच्या धाडी पडतील म्हणून दबावाखाली गेला आहेस का?  क्रीडा विश्वातले तुम्ही देव माणूस आहात. भारतरत्नही आहात. पण क्रीडाविश्वातील काही महिला लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत, तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि माणुसकी कुठेच दिसून येत नाही, असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे. 

संजय राऊत नेमके काय म्हणाले?

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर उत्तर देताना, ही भूमिका पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. केंद्र सरकारने भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रात ठीक आहे. प्रत्येकाने आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा ही सगळ्यांचीच भूमिका आहे. पण त्यांना न्याय केंद्र सरकार नाकारत आहे, असे संजय राऊत म्हणाले. सचिन तेंडुलकरवर थेट बोलणे संजय राऊत यांनी टाळल्याचे सांगितले जात आहे.
 

Web Title: sanjay raut reaction over congress banner about sachin tendulkar on wrestlers agitation in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.