मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:51 IST2025-10-04T10:51:10+5:302025-10-04T10:51:58+5:30
बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती तेव्हा मी तिथे होतो. शेवटच्या क्षणापर्यंत मी तिथे होतो. आम्ही मोजकेच लोक होतो. आम्हाला माहिती आहे. आमच्या सगळ्यांची काय अवस्था होती. रामदास कदम कुठे होते? कुणी नव्हते असं त्यांनी सांगितले.

मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई - ज्या रामदास कदमांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी पक्षातील लोकांचा विरोध होता तरीही उद्धव ठाकरे यांनी त्यांना कायम संधी दिली. आज ते जे गरळ ओकतायेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना हे लोक करत आहेत त्यांना याची जबर किंमत मोजावी लागणार आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रामदास कदम यांच्या आरोपावर ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, १२ वर्ष रामदास कदम यांना विधान परिषदेवर पाठवले होते, अशा माणसांनी ठाकरे कुटुंबासोबत कृतज्ञ राहायला पाहिजे होते मात्र आता ते गरळ ओकत आहेत. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायेत, त्याची जबर किंमत या लोकांना मोजावी लागेल. बाळासाहेब ठाकरेंबाबत तुम्ही अशी विधाने करताना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. ज्या घटनाक्रमाबद्दल ते सांगतायेत तेव्हा तुम्ही इथं उपस्थित नव्हता. शेवटचे ८ दिवस बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती तेव्हा मी तिथे होतो. शेवटच्या क्षणापर्यंत मी तिथे होतो. आम्ही मोजकेच लोक होतो. आम्हाला माहिती आहे. आमच्या सगळ्यांची काय अवस्था होती. रामदास कदम कुठे होते? कुणी नव्हते असं त्यांनी सांगितले.
तसेच उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्याइतपत या लोकांची मजल गेली असेल तर त्याची जबर किंमत मोजावी लागेल. आज १२ वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवून दिले. रामदास कदम यांनी पक्षात काम केले, त्यांनाही पक्षाने भरपूर दिले. खासकरून उद्धव ठाकरे यांनी रामदास कदमांना दिले. विरोधी पक्षनेते पद, मंत्रिपद हे उद्धव ठाकरेंनी दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जेव्हा पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली. तेव्हा बाळासाहेबांसोबत काम करणाऱ्या या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने वागणूक दिली असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, या प्रसंगावर फक्त टाळ्या मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत परंतु त्यांना टाळ्या नाही तर महाराष्ट्र त्यांच्यावर थुंकतोय. मराठी माणूस जो बाळासाहेब ठाकरे यांची विटंबना करतो त्यांच्यावर थुंकतो. आम्ही अजून जिवंत आहोत. काय करायचे यापुढे ते आम्ही पाहू. पद आणि पैशासाठी वेडा झालेला माणूस कुठल्याही प्रकारची विधाने करतो. अनिल परबांची पत्रकार परिषद नीट ऐका, त्यावर ते बोलतील. एकनाथ शिंदेंपासून सगळे जे पक्ष सोडून गेलेत, जे भाजपाच्या चरणी विलीन झालेत. शाहांच्या जोड्याची शस्त्र म्हणून पूजा करतायेत ते कधीही बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानत नाहीत असंही संजय राऊत यांनी सांगितले.