“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:10 IST2025-05-03T13:08:20+5:302025-05-03T13:10:38+5:30
Sanjay Raut News: अमित शाह यांचा पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असतील, तर ती महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
Sanjay Raut News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर मुख्यमंत्रीपदावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, यानंतरही अनेकदा मुख्यमंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपा नेते असतील, अनेकदा मुख्यमंत्रीपदावरून दावे केले. यातच अजित पवार यांनीही यासंदर्भात विधान केले. यावरून संजय राऊत यांनी टीका केली.
अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णयही आम्ही घेतला. महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असे राही भिडे म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना तसे वाटत असते, पण शेवटी योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटते की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण कुठे जमते. कधी ना कधी तो योगही जुळून येईल, नाही असे नाही, अशी मन की बात अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.
अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत
योग कसा येणार? मी नेहमी सांगतो की, छगन भुजबळ शिवसेनेत असते, तर मुख्यमंत्री झाले असते. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते, तर पुन्हा शिवसेनेतूनच मुख्यमंत्री झाले असते. मनोहर जोशी झाले ना. ते पक्षासोबत राहिले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले, तर भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित भविष्यात होतील. हे त्यांना स्वतः अमित शाह यांनी सांगितले आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
आम्ही अमित शाह यांच्या कार्यक्रमाला जाणार नाही
जोपर्यंत वेगळा गट आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला, तर भविष्यात भाजपाचा चेहरा म्हणून संधी मिळू शकते. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल. अमित शाह महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात. एक भाजपा, दुसरा एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि तिसरा अजित पवारांचा पक्ष. अमित शाह यांच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असतील, तर ती महाराष्ट्राशी बेईमानी आहे. ज्या अमित शाह यांनी महाराष्ट्र तोडण्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित पक्ष तोडले. अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांचा सत्कार करणार का, अजिबात नाही. आम्ही अमित शाह यांच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ ते ४ मे या काळात मुंबईच्या वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.