"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:08 IST2026-04-03T13:07:37+5:302026-04-03T13:08:52+5:30
Sanjay Raut Criticize Congress: राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका लढण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
- प्रशांत भदाणे
जळगाव - राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका लढण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "काँग्रेस हा पक्ष बिहार, पश्चिम बंगाल, नागालँड असेल अशा सगळ्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी पुढे जातो आणि निकाल लागल्यानंतर कळतं की आपण कुठे आहोत. ते कुठे आहेत? ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे; त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार आहे. या दोन्ही जागांसंदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील आणि तो घ्यावा लागेल. राहुरीमध्ये लढण्याची आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण भाजपला मदत होईल, अशी भूमिका कुणी घेऊ नये, असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे", अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत जळगावात पत्रकार परिषदेत दिली.
संजय राऊत म्हणाले की,राहुरी आणि बारामतीमध्ये आता पोटनिवडणूक होत आहे. आमचा प्रयत्न आहे की, या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये या आधीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीने लढवली होती. आता मला नक्की माहिती नाही पण, त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अधिकार आहे. काँग्रेस हा पक्ष बिहार, पश्चिम बंगाल, नागालँड असेल अशा सगळ्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी पुढे जातो... आणि निकाल लागल्यानंतर कळतं की आपण कुठे आहोत. ते कुठे आहेत? ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे; त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार आहे... त्यामुळे राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद असल्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांना बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही. पण त्या ठिकाणी जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागांसंदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील आणि तो घ्यावा लागेल. राहुरीमध्ये लढण्याची आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण भाजपला मदत होईल, अशी भूमिका कुणी घेऊ नये, असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे.
जळगाव दौऱ्याबाबत काय म्हणाले?
जळगाव येण्याचा आनंद असतो. पक्ष बांधणीसाठी आलो आहे. लोकसभेचा उमेदवार आतापासून निवडावा लागणार आहे. राज्य आणि देशाचे राजकारण हे बदलत जाणार आहे. राज्यापुढे अनेक समस्या आहे.
सरकार असंवेदनशील असल्याची टीका
अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, सरकारने आणि पालकमंत्र्यांनी तातडीने संवेदना व्यक्त केल्या पाहिजे. मात्र तसे दिसत नाही, शेतकऱ्याचा मदत केली पाहिजे, मात्र तशी सरकार पावले उचलत असल्याचं दिसत नाही, सरकार असंवेदनशील...
गिरीश महाजन यांच्यावर टीका
चोवीस तास राजकारण करणारे कुठे आहेत. संकटमोचक गिरीश महाजन, ते केवळ राजकीय संकट मोचक आहेत का? शेतकरी वेळी कुठे,आमदार पळविणे हेच काम संकट मोचकच आहे का?
पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप
पोलिस गुंडगिरी करत आहेत, जळगाव पोलिस गणवेश घालून विरोधकांवर कारवाया कारणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय मोचकाच्या संपर्कात आहे, पुढील निवडणूक ते भाजपकडून लढवतील असे दिसते.
खरात प्रकरणावर सावध प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे, पोलिसांनी योग्य तपास केला आहे, संदीप कर्णिक यांच्यामुळे खरात लंगडतांना दिसला, गृहखाते काय तपास करते, त्यात कोणाला सोडले, अडकवले यावर बोलता येईल, एसआयटी सुद्धा उत्तम काम करत आहे. या प्रकरणात सुषमाताई आणि रोहित पवार यांच्यामध्ये असलेल्या माहितीमध्ये तफावत आहे, माझ्याजवळ अधिक माहिती नसल्याने मी याबाबत बोलू इच्छित नाही, आसाराम बापू आज मुक्त आहेत, राम रहीम मुक्त आहे, निवडणुकीसाठी त्याला बाहेर आणले गेले होते, अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार.
महायुतीत खदखद असल्याचा दावा
राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे गटातले काही आमदार पुढील काळात भाजपमध्ये जाऊ शकतात, भविष्यात या पक्षांची पंचवीस आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.