Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:14 IST2025-10-20T17:13:02+5:302025-10-20T17:14:14+5:30
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार असल्याचा जो गंभीर आरोप केला आहे, त्यावर शिंदे गटातील नेते संजय निरुपम यांनी जोरदार पलटवार केला.

Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत ९४ लाख ते ९६ लाख खोटे मतदार असल्याचा जो गंभीर आरोप केला आहे, त्यावर शिंदे गटातील नेते संजय निरुपम यांनी जोरदार पलटवार करत राज ठाकरेंना थेट आव्हान दिले. केवळ सभांमधून 'हवाबाजी' न करता, या कथित खोट्या मतदारांची संपूर्ण यादी सार्वजनिक करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.
राज ठाकरेंच्या आरोपाला उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले की, निवडणुका हरण्यापूर्वी विरोधक मतचोरी किंवा मतदार यादीत गडबडीचा आरोप करण्याचा नवा 'छंद' जोपासत आहेत. राज ठाकरे यांनी ९४ लाख ९६ लाख खोटे मतदार याद्यांमध्ये घुसविण्यात आले, असा आरोप केला आहे. मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी या मतदारांची संपूर्ण यादी सार्वजनिक करावी. ही फक्त हवाबाजी आहे."
महाराष्ट्रातील ९.५० कोटी मतदार आणि सव्वा लाखांच्या आसपासच्या मतदान केंद्रांचा संदर्भ देत निरुपम यांनी इतक्या मोठ्या संख्येने खोटे मतदार तपासणे ही मोठी बाब असल्याचे स्पष्ट केले. "कोणताही व्यक्ती उठतो आणि खोटा आकडा लोकांसमोर ठेवतो. मी राज ठाकरेंना खुलं आव्हान करतो. ९४ लाख मतदार खोटे असल्याचे त्यांनी तपासले असेल तर, ही खूप मोठी बाब आहे. पण पुराव्याशिवाय बोलणे योग्य नाही", असेही ते म्हणाले.
या संदर्भात निरुपम यांनी बिहार निवडणुकीच्या वेळचा दाखला दिला. बिहार निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी चौकशीनंतर ६० ते ६४ हजार खोटे मतदार असल्याचे समोर आले होते. महाराष्ट्रातही असे खोटे मतदार आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, पण त्यासाठी खोटे मतदार कोण आहेत, याची अधिकृत माहिती देणे आवश्यक आहे, असे मत निरुपम यांनी व्यक्त केले.
राज ठाकरेंनी इतके-तिकडे सभांमध्ये अशी बडबड करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाकडे जावे आणि त्यांच्यासमोर खोट्या मतदारांची यादी ठेवावी. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असून, त्यासाठी पुराव्यांसह तक्रार करण्याची गरज निरुपम यांनी व्यक्त केली.