पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:21 IST2025-09-16T18:18:51+5:302025-09-16T18:21:55+5:30
Sangli Junior Engineer Avdhoot Wadar: कनिष्ठ अभियंता मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
Sangli Junior Engineer Avdhoot Wadar: काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर अवधूत वडार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झालाय, असा आरोप अवधूत वडार यांच्या कुटुंबियांनी केला. या प्रकरणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा अवधूत वडार यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
सांगलीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अभियंता अवधूत वडार यांचा मानसिक छळ केला जात होता. बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांसह त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात आला. यातूनच हा घातपात घडला, असा आरोप वडार यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
अवधूत यांच्या घातपाताचा संशय
अवधूत या दबावामुळे काही दिवसांपासून तणावात होता. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते, असा अवधूतच्या चुलत्याने म्हटले होते. याच कारणातून अवधूतने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा, असा संशय कुटुंबांनी व्यक्त केला. ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिली, त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्याच्या कुटुंबांने घेतला.
दरम्यान, शहर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी अवधूत वडार हे जत येथून निघाले होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. यानंतर नातेवाईकांनी त्यांचा शोधला. यातच पोलिसांना सांगलीमधील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. रेस्क्यू टीमने नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढला. पोलिसानी तपास केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा असल्याचे समोर आले.