"अजितदादांचा इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास"; दमानियांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे भावनिक प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:48 IST2025-10-13T18:37:38+5:302025-10-13T18:48:50+5:30
अजित पवार यांना अर्थकारण खरंच कळतं का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला होता.

"अजितदादांचा इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास"; दमानियांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे भावनिक प्रत्युत्तर
Rupali Chakankar vs Anjali Damania: राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिक्षणावरुन सध्या जोरदार वाद सुरु झालाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवरून बोचरी टीका केली. अजित पवार दहावी पास असून त्यांना अर्थकारण खरंच कळतं का? असा सवाल अंजली दमानियांनी केला होता. दमानियांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी इंजिनियरला लाजवेल असा अजित पवार यांचा अभ्यास आहे, असं म्हटलं.
अंजली दमानिया रविवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली. महाराष्ट्रावर असलेल्या कर्जाच्या मुद्द्यावरुन अंजली दमानिया माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास आहेत असं म्हटलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झाले असून त्यांनी दमानिया यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत आहे. रुपाली चाकणकर यांनी एक्स पोस्ट करत अजित पवार यांनी शिक्षण अर्धवट सोडण्याचे कारण सांगितले.
"आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते.वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे. शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच," असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.
अजित पवारांनी कृषी मंत्री व्हावे; दमानियांचा पुन्हा पलटवार
रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर अंजली दमानिया यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली. "मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंड हा देश ४१२८५ चौ किमी आहे आणि महाराष्ट्र ३०७७१३ चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत ८ पट मोठे आहे. स्वित्झर्लंड ची GDP ८३,३३,००० कोटी आहे आणि महाराष्ट्राची ४२,६७,००० कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता ९,३२,००० कोटी आहे. ते कसे कमी होणार ? काही ब्लू प्रिंट आहे का?," असा सवाल दमानियांनी केला.
काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?
"महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे दहावी पास आहेत. त्यांच्या शिक्षणावर मला टीका करायची नाही. पण अर्थकारण त्यांना खरंच कळतं का यासाठी मी हे उदाहरण दिलं. महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड इतका मोठा आहे. पण तो एक देश आहे आणि आपला महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे. महाराष्ट्रावर सध्या नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. हे पैसे कुठूण आणणार यावर कुणीही चर्चा करत नाही. क्षुल्लक गोष्टींचं राजकारण कायमच केलं जातं पण हा प्रश्नही महत्त्वाचा आहे," असं दमानियांनी म्हटलं.