ट्रकचालकांना लुटणारा सराईत जेरबंद, हत्या करून झाला होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 13:40 IST2019-04-14T13:39:39+5:302019-04-14T13:40:58+5:30
विशेष म्हणजे सदर आरोपीला यापूर्वी हत्येसह रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणे व चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली

ट्रकचालकांना लुटणारा सराईत जेरबंद, हत्या करून झाला होता फरार
वर्धा : धोत्रा शिवारात ट्रकचालकाची हत्या करून ट्रकचालकाकडील रोख व इतर मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या दहा तासात जेरबंद केले आहे. राहूल भीमण्णा पवार (१९) रा. हिंगणघाट असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो कर्नाटक राष्ट्रातील यादगिरी येथील मुळ रहिवासी आहे.
विशेष म्हणजे सदर आरोपीला यापूर्वी हत्येसह रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणे व चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून तो इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. परिणामी पोलिसांनीही आपल्या तपासाला गती देत या टोळीतील सर्व सदस्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
धोत्रा शिवारातील घटनेनंतर दोन चमू तयार करून तपासाला गती देण्यात आली. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे राहूल पवार याला येणोरा पारधी बेड्यावरून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून तपास सुरू आहे.
- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. वर्धा.