अजित पवारांचा २७ जानेवारीचा प्लॅन ऐनवेळी का बदलला? रोहित पवारांचा राजकीय फाईल, बडा नेता भेटण्यावरून मोठा दावा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:23 IST2026-02-10T17:23:06+5:302026-02-10T17:23:43+5:30
Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: अजित पवारांचा विमान प्रवास पूर्वनियोजित नव्हता! २७ जानेवारीच्या रात्री मंत्रालयातील 'त्या' फाईलमुळे दादांचा प्लॅन बदलला. रोहित पवारांचे खळबळजनक आरोप. वाचा सविस्तर.

अजित पवारांचा २७ जानेवारीचा प्लॅन ऐनवेळी का बदलला? रोहित पवारांचा राजकीय फाईल, बडा नेता भेटण्यावरून मोठा दावा...
मुंबई : अजित पवार यांचा विमान प्रवास हा पूर्वनियोजित नव्हता, तर तो ऐनवेळी बदलेला होता, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. २७ जानेवारीच्या रात्री नेमके काय घडले आणि कोणत्या फाईलमुळे अजित दादांना मुंबईत थांबावे लागले, याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
रोहित पवारांच्या दाव्यानुसार, २७ जानेवारीला संध्याकाळी अजित पवार गाडीने पुण्याला निघणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. मात्र, दोन कारणांमुळे त्यांचा प्रवास रद्द झाला. पूर्व विदर्भातील एक मोठा नेता दादांना भेटायला येणार होता, त्यांना उशीर झाला. तसेच एका फाईलसाठी अजित पवारांना थांबावे लागल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
रोजच्या वेळापत्रकानुसार अजित पवार अधिकाऱ्यांना म्हणाले की, ४-५ तास मी माझी कामे करणार आहे. काही कार्यकर्ते, कर्मचारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. एक फार मोठे नेते त्यांना भेटण्यासाठी येणार होते, त्यांना उशीर झाला आणि अजित पवार सायंकाळी ५ वाजता निघू शकले नाहीत. पूर्व विदर्भातील हे नेते आहेत. सही करावीच लागते, फार महत्वाची फाईल आहे मग ती फाईल कुठे आहे हे पाहिले गेले तेव्हा ती फाईल घरी नव्हती. ती मंत्रालयाच्या कार्यालयात होती. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत. ती फाईल येईपर्यंत वेळ गेला. एक मोठा नेता आपल्या पक्षातील बोलत असेल तर सही करावीच लागेल. त्या फाईलसाठी अजित पवारांचा वेळ गेला. तेथील लोक आमच्याही जिवाभावाचे होते. त्यांनी जे सांगितले आहे, ते असे की कुठल्यातरी राजकीय कन्सल्टंट आहे त्यांचा जो काँट्रॅक्ट आहे त्याचा काहीच फायदा होत नाही, ते रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. यामध्ये वेळ गेला आणि अजित पवारांना बारामतीला गाडीने जायचा प्लॅन रद्द करावा लागला, असा दावा रोहित पवार यांनी केला.
'मोसाद' आणि घातपाताचा संशय
इस्रायली गुप्तचर यंत्रणा 'मोसाद'च्या पुस्तकाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "एखाद्या व्यक्तीला मारायचे असेल तर त्याचा चालक किंवा पायलट मारणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे, आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही."