राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 09:42 IST2025-08-14T09:38:17+5:302025-08-14T09:42:12+5:30
NCP SP Group Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
NCP SP Group Rohit Pawar News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. त्यापूर्वीच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढवित आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्यावरूनही अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. यातच रोहित पवार यांनी अजित पवार यांना थेट ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरूवात झाल्याचे समजते.
आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत. भाजपाच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे जर अजित पवारांनी भाजपाची साथ सोडली आणि शरद पवार यांच्यासोबत पुरोगामी विचारासोबत ते आले, तर त्यावेळेस आम्ही विचार करू. पण, अजित पवार जर भाजपासोबत असतील तर आम्ही एकत्रित येऊच शकत नाही. भाजपाला त्यांनी सोडले, तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचे तो विचार केला जाईल आणि निर्णय घेतला जाईल, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रोहित पवार दादांची पोकळी भरून काढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय ?
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना, शरद पवार यांच्यानंतर पक्षात अजित पवारांचा वरचष्मा होता. त्यांचा 'दादा' म्हणून दरारा होता. 'राष्ट्रवादी'चे दोन गट झाल्यानंतर शरद पवार गटात अजितदादांची पोकळी निर्माण झाली. सुप्रिया सुळे सक्रिय असल्या तरी 'दादां'ची जागा 'ताई' घेऊ शकत नाहीत, हे कार्यकर्ते खासगीत मान्य करतील. रोहित पवार यांनी भंडारा येथे बोलताना एक वक्तव्य केले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. 'अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, अन्यथा नाही' असे त्यांचे म्हणणे होते. अजितदादांना थेट ऑफर दिल्याने, पक्षात त्या दादांची जागा हे दादा भरून काढत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले. लोकसभा निवडणुकीत अपयश आले, तरी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली. अजित पवार पुन्हा उपमुख्ममंत्री झाले. अजित पवारांसोबत जे आमदार गेले, ते आता सत्तेत असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आणखी काही नेते त्यांची साथ सोडताना पाहायला मिळत आहेत.