'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:27 IST2026-01-15T18:51:14+5:302026-01-15T19:27:34+5:30
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणूक पार पडल्या. अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेतील गोंधळ असल्याचे समोर आले होते.

'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणूक पार पडल्या. अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेतील गोंधळ असल्याचे समोर आले होते. यावरून आता भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. "आता निवडणुकी संदर्भात काही क्रांतीकारी बदल होणे गरजेचे आहे. मतदान करणे हे अनिवार्य करण्याचा कायदा करता येईल का हे तपासले पाहिजे. मतदार याद्या बिनचूक केल्या पाहिजेत, प्रत्येकाचे आधारला मोबाईल नंबर लिंक आहे. याचा उपयोग करुन याचा डेटा बेस करुन त्यांना त्यांचे सेंटर त्यांचा नंबर पोहोचवता येईल का हे पाहिले पाहिजे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
"आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर आमच्या एका मंत्र्यांचे नाव मतदार यादीत नाही, मंत्र्यांचेच नाव यादीत नाही. सामान्य लोक त्यांचे कर्तव्य निभावण्यासाठी बिचारे दोन-दोन तास रांगेत उभे राहतात, अशा मतदारांना सॅल्युट केले पाहिजे. तर आपल्या प्रशासनाला या दृष्टीने बदल केला पाहिजे. आपल्याकडे वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या जातात, या निवडणुकांना तीन ते साडे तीन हजार कोटी केला जातो. मागच्या वर्षी आयोगाने साडे पाच हजार कोटी रुपये केला होता. एवढा खर्च करुन त्याचा उपयोग काय आहे? आमचा मतदार बेचैन आहे. मतदार मतदान करता येत नाही म्हणून दु:ख व्यक्त करत आहे, ही चिंतेची बाब आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
आता मतदान प्रक्रियेवर काम करणे गरजेचे आहे. आता मी आमच्या मतदारसंघात मी स्वत: यादीवर काम करणार आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान?
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली. तब्बल ९ वर्षांनंतर होत असलेल्या या महापालिका निवडणुकांमध्ये उत्साह दिसून आला असला, तरी अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी अडचणी समोर आल्या. मतदारयादीतील घोळ, मतदान केंद्र शोधताना मतदारांची धावपळ, बोटावर लावलेली शाई लवकर पुसली जाण्याच्या तक्रारी आणि दुबार मतदानाच्या घटनांचे आरोप...या कारणांमुळे काही भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.