"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:41 IST2025-11-25T14:40:29+5:302025-11-25T14:41:39+5:30
तिजोरीच्या चाव्या जनतेकडे असतात, असेही त्या म्हणाल्या

"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
Supriya Sule : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी. यानिमित्त शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतरावांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. आजचा महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दुसऱ्या कामात व्यस्त असतील. कोणी काय करायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. प्रशासनाकडून फारशा काही हालचाली येथे दिसत नाहीत. यशवंतराव चव्हाण हे केवळ राज्याचे नाही, तर देशाचे नेते आहेत. हिमालय अडचणीत असताना देशासाठी हा सह्याद्री धावून गेला होता, हा इतिहास आहे. चव्हाण साहेबांचे योगदान फार मोठे आहे. त्यांचा इतिहास कोणीच विसरु शकत नाही. पण माझ्या मनाला आज खंत वाटत आहे की, राज्य सरकारमधील आज इथे कोणीच नाही. मला वाटते की सरकार कोणचेही असो, मानसन्मान पाळला जायलाच हवा," अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.
"प्रशासन मला आज इथे कुठेच दिसत नाही. दुर्दैव आहे की, राज्य सरकराने या गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे. सरकार कोणाचेही असो. निवडणुका येतील, जातील. पण काही प्रथा पाळायलाच पाहिजेत. चव्हाण साहेबांचा मानसन्मान केलाच पाहिजे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
"स्थानिक प्रश्न, स्थानिक विकास आणि स्थानिक परिस्थिती यावरच अशा निवडणुका घडतात. आदरणीय शरद पवार साहेबांनीही सांगितले आहे. स्थानिक नेतृत्वाने स्थानिक पातळीवर भूमिका ठरवावी. राज्याच्या तिजोरीची चावी कोणाकडेही नसते. ती जनतेकडे असते. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा पैसा हा लोकशाहीतील अधिकार असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. साम, दाम, दंड, भेद यांच्या आधारे राज्य चालत आहे, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं. आमची विचारधारा लोकशाही मार्गाची आहे. आज सत्ता एका हातात केंद्रीत होताना दिसते, हे सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे", असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.